Hasan Mushrif : आमदार हसन मुश्रीफांविरोधात फिर्याद देणाऱ्यासह 16 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
Hasan Mushrif : आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता मुश्रीफांविरोधात फिर्याद देणाऱ्यासह 16 जणांविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Hasan Mushrif : आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता मुश्रीफांविरोधात फिर्याद देणाऱ्यासह 16 जणांविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद संजय चितारी यांनी दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुरगूड पोलिस ठाण्यासमोरील ठिय्या आंदोलन मुश्रीफ समर्थकांनी मागे घेतले. तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन सुरु होते. त्यामुळे मुरगूड पोलिस ठाण्याचा परिसर राजकीय आखाडा होऊन गेला. सभासदांची कोणतीही संमती न घेता आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात फिर्याद दिल्याप्रकरणी विवेक विनायक कुलकर्णीसह 16 जणांवर मुरगूड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
सहा तासांपेक्षा अधिक काळ ठिय्या आंदोलन
मुश्रीफ यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना बदनाम करणाऱ्या भाजपच्या षडयंत्रात सहभागी झाल्याचा आरोप मुश्रीफ समर्थकांनी केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मुरगूड पोलिसांवर धडक दिली. ठाण्याच्या दारात सहा तासांपेक्षा अधिक काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. सभासदांच्या संमतीशिवाय कागल येथील विवेक विनायक कुलकर्णी व अन्य 16 जणांनी मुश्रीफ यांच्याविरोधात घोरपडे कारखान्यात शेअर्स देतो म्हणून 40 हजार शेतकऱ्यांची 40 कोटींची फसवणूक केल्याची खोटी तक्रार दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. तक्रार दिल्यानंतर कुलकर्णींसह अन्य 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रार खोटी असून कोणत्या कागदपत्रांआधारे गुन्हा दाखल केला? तक्रार दाखल करणाऱ्या त्या 16 जणांची नावे द्या, त्यांनी कोणती कागदपत्रे पुरवली त्याची माहिती द्या, अशी मागणी पोलिस अधिकाऱ्यांकडे आंदोलकांकडून करण्यात आली. मात्र, माहिती न दिल्याने मुरगूड पोलिस ठाण्यामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांवर सरकारी यंत्रणेचा दबाव असल्याचा आरोपही करण्यात आला. पोलिसांनी संबंधित 16 जणांवर बदनामीचा गुन्हा दाखल केल्यानंतर मध्यरात्री दीड वाजता कार्यकर्ते घरी परतले.
गुन्हा दाखल केल्यानंतरच माघार
मुश्रीफांवर गुन्हा दाखल करणाऱ्या संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत येथून हालणार नाही, अशी भूमिका कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी घेत उन्हात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. भाजप सरकार, किरीट सोमय्या व समरजितसिंह घाटगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु होती. यावेळी भय्या माने, प्रवीणसिंह पाटील, अंबरिश घाटगे, डी. डी. चौगुले, सतीश पाटील, विकास पाटील, मनोज फराकटे, प्रवीण भोसले आदींनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, शशिकांत खोत, ॲड. सुधीर सावर्डेकर, देवानंद पाटील, राजू आमते, नामदेव भांदिगरे उपस्थित होते. कार्यकर्ते हटत नसल्याने वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर 16 जणांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
इतर महत्वाच्या बातम्या