Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू, शाहूवाडीत गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात एकाच दिवशी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. शाहूवाडी तालुक्यातील उदगिरीमध्ये गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात एकाच दिवशी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. शाहूवाडी तालुक्यातील उदगिरीमध्ये गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यांना हाताला, काखेत, डाव्या कुशीत गंभीर जखम झाली आहे. शाहूवाडी तालुक्यात वन्य जीवांकडून सातत्याने शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. याच मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात 21 मार्च रोजी शाहूवाडी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता.
टँकर पलटी होऊन चालक ठार
अणुस्कुरातून मलकापूरमार्गे कराडकडे गॅस घेऊन निघालेला टँकर शाहूवाडी तालुक्यातील माणमध्ये तीव्र वळणावर उलटल्याने चालकाचा मृत्यू झाला. चालक सुनील आनंदा लाड (रा. किल्ले मोरगिरी, ता. पाटण, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. तीव्र उताराच्या वळणावर चालकाचे टँकरवर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. याच ठिकाणी सहा महिन्यांपूर्वी ट्रकची पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला होता. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर वारूळ येथे गॅसने भरलेल्या टँकरची झाडाला धडक होऊन केबीनने पेट घेतल्याची घटना अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच घडली होती.
गारगोटीत थांबलेल्या दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू
दरम्यान, भुदरगड तालुक्यातील गारगोटीमध्ये टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महावितरण कार्यालयाजवळ मालवाहू टेम्पोने थांबलेल्या दुचाकीस्वारास धडक दिल्याने शहाजी मारुती खेगडे (रा. पुष्पनगर पैकी खेगडेवाडी) याचा मृत्यू झाला. पोलिसांनी टेम्पो चालकास अटक केली आहे. टेम्पो गारगोटीहून गडहिंग्लजकडे जात असताना महावितरण कार्यालयाजवळ टेम्पोने रस्त्याच्या कडेला दुचाकीसह थांबलेल्या शहाजीला जोराचे धडक दिली. टेम्पो अंगावरून गेल्याने गंभीर डोक्याला गंभीर झाली होती. उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला.
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू
पन्हाळा तालुक्यातील पोखले येथील युवक अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला. सूरज आनंदा पाटील (वय 25) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे. अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्याला अवघ्या आठ महिन्याची मुलगी असून त्याच्या पक्षात आई-वडील, पत्नी, एक बहीण असा परिवार आहे. पन्हाळा तालुक्यातील अन्य एका घटनेत कोतोली ते कोतोली फाटा रस्त्यावर उत्रेमध्ये (ता. पन्हाळा) ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चालक विठ्ठल धोंडीराम गुरव (वय 40 रा. परळी, ता. शाहूवाडी) याचा मृत्यू झाला. अन्य एक जखमी झाला.
शाहूवाडी तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
शाहूवाडी तालुक्यातील उदगिरीपैकी केदारलिंगवाडीमधील गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बंडू बाबू फिरंगे (वय 65 रा. उदगिरीपैकी केदारलिंगवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. फिरंगे नेहमीप्रमाणे बैलांना पाणी पाजण्यासाठी ओढ्यावर गेले होते. यावेळी मागून आलेल्या गव्याने धडक मारून जखमी केले. धडक मारल्यानंतर बैल उधळले तेव्हा गवा जंगलाच्या दिशेने पळाला व फिरंगे जखमी अवस्थेत पडून राहिले. बैल घरी गेल्यानंतर ते घरी आले नाहीत म्हणून घरचे ओढ्याच्या दिशेने गेल्यानंतर फिरंगे जखमी अवस्थेत दिसून आले. त्यांना हाताला, काखेत, डाव्या कुशीत गंभीर जखम झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या