Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपात पदांवरून पुन्हा उलथापालथी; हर्षजित घाटगे दुसऱ्यांदा शहर अभियंता पदावरून बाजूला; रमेश मस्करांच्या नियुक्तीवरूनही वादाची ठिणगी
Kolhapur Municipal Corporation: हर्षजित घाटगे आणि रमेश मस्कर यांची शहर अभियंता पदासाठी नावे चर्चेत होती. गेल्या महिन्यात 1 जून रोजी हर्षजित घाटगे यांची नियुक्ती शहर अभियंता पदावर करण्यात आली होती.

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपामध्ये शहर अभियंता पदावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या सेवानिवृत्तीनंतर जल अभियंता असलेल्या हर्षजित घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांना अवघ्या सव्वा महिन्यात या पदावरून बाजूला करण्यात आलं आहे. आता त्यांच्या जागी उपशहर अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घाटगे यांच्याकडे पुन्हा जल अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन वर्षाच्या कालावधीत दोनदा हर्षजीत घाटगे यांना पदावरून बाजूला करण्यात आलं आहे. मार्च 2023 मध्ये खराब रस्त्यांवरून एबीपी माझाने सातत्याने आवाज उठवला होता. त्यानंतर नेत्रदीप सरनोबत यांची शहर अभियंता पदावरून तातडीने उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांच्या अंतर्गत घडामोडीनंतर पुन्हा नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे ते पद आले होते आणि सेवानिवृत्तीपर्यंत कायम होते. त्यांनी मुदतवाढीसाठी सुद्धा मोर्चेबांधणी केली होती. मात्र, त्यांना मुदतवाढ मिळू शकली नाही.
1 जून रोजी हर्षजित घाटगे यांची नियुक्ती
नेत्रदीप सरनोबत यांच्या निवृत्तीनंतर हर्षजित घाटगे आणि रमेश मस्कर यांची शहर अभियंता पदासाठी नावे चर्चेत होती. गेल्या महिन्यात 1 जून रोजी हर्षजित घाटगे यांची नियुक्ती शहर अभियंता पदावर करण्यात आली होती. मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढला होता. यानंतर आता घाटगे यांच्या नियुक्तीला सव्वा महिना सुद्धा होत नाही तोपर्यंत नगरविभागाकडून आलेल्या आदेशानंतर त्यांना पुन्हा पदावरून बाजूला करून रमेश मस्कर यांच्याकडे हा पदभार देण्यात आला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा हर्षजीत घाटगे यांना पदावरून हुलकावणी मिळाली आहे. दरम्यान, हर्षजित घाटगे यांच्याशी एबीपी माझाने संपर्क साधला असता त्यांनी हा शासनाचा निर्णय असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या निर्णयावर अधिक भाष्य उचित नसल्याचे त्यांनी नमूद केले.
रमेश मस्करांच्या नियुक्तीवरूनही वाद
दरम्यान, रमेश मस्कर यांची पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर वादाची ठिणगी पडली आहे. माजी नगरसेवक जयंत पाटील यांनी मस्कर यांच्या नियुक्तीविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. उपशहर अभियंत्याला शहर अभियंता करण्याची सुपारी कोणी घेतली आहे? यामागे कोण आहे हे आम्ही शोधून काढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांची झालेली नियुक्ती चुकीची असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























