Mahadevrao Mahadik: अप्पा महाडिक म्हणजे नुसता धर की, वढ की, पकड की लगेच चितपट कर, 82 वर्षाच्या पैलवानाची कोल्हापुरात जादू कायम
Rajaram Sakhar Karkhana : आपल्याकडे 'शोले'चा रुपया आहे असं सांगणाऱ्या महादेवराव महाडिकांनी राजारामच्या निवडणुकीत एकतर्फी बाजी मारली आहे.
कोल्हापूर: हे मुन्ना-बिन्ना या लेव्हलला चालतंय, माझ्या लायकीला नुसता धर की, वढ की, पकड की, लगेच चितपट कर असं असतंय हो. हे वाक्य आहे कोल्हापुरातील माजी आमदार महादेवराव उर्फ अप्पा महाडिक (Mahadevrao Mahadik) यांचं. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या आधी अप्पा महाडिकांनी हे वक्तव्य केलं आणि आज राजारामच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवत आमदार सतेज पाटलांना (Satej Patil) चितपट केलं. नावात महादेव आहे, मी जादूगर आहे असं ते नेहमी म्हणतात आणि आता 82 वर्षांचे अप्पा महाडिक अजूनही जिल्ह्याचे जादूगार असल्याचं या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट झालंय.
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिष्ठेच्या बनलेल्या राजाराम कारखान्याची (Rajaram Sakhar Karkhana Election Result) बाजी महाडिकांनी मारली आणि सतेज पाटलांचाच कंडका पाडला. महाडिकांना ही निवडणूक सोपी असतेय हे अप्पा महाडिकांनी आधीच स्पष्ट केलेलं. त्या पद्धतीने त्यांनी एकतर्फी बाजी मारली आणि पुन्हा एकदा गुलाल उधळला.
महादेवराव रामचंद्र महाडिक म्हणजे 82 वर्षाचा पैलवान. कपाळावर गंध, चेहऱ्यावर चकचकीत तेज, डोक्याला टिळा, अंगावर सफारी आणि बलदंड शरीर असा कोल्हापुरी रांगडा बाज. एकेकाळी कोल्हापूरच्या राजकारणातला हा बाहुबली. 18 वर्षे विधानपरिषदेवर आमदार, गोकुळ, जिल्हा बँक आणि जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेले महाडिक हे नाव कोल्हापुरातील प्रत्येकाला माहीत.
Mahadevrao Mahadik: महाडिक राजकारणातून संपले असं म्हटलं जायचं...
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुतण्या धनंजय महाडिकांचा पराभव झाला आणि त्यानंतर महाडिक कुटुंबाला राजकारण जड जाऊ लागलं. एकेकाळी जिल्ह्यावर पकड असलेल्या अप्पांना सतेज पाटील तितक्याच ताकदीने नडले. अप्पा महाडिकांचा विधानपरिषदेत पराभव, त्यानंतर धनंजय महाडिकांचा लोकसभेत पराभव, मुलगा अमल महाडिकांचा विधानसभेत पराभव, सून शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सोडावं लागलं. त्यानंतर महाडिकांचं शक्तीस्थान असलेलं गोकुळ हातातून गेलं. लोकसभेपासून ग्रामपंचायतींपर्यंत एकामागोमाग पराभव पाहणारे महाडिक राजकारणातून संपले असं म्हटलं जायचं.
ज्या दिवशी अप्पांचा विधानपरिषदेत सतेज पाटलांनी पराभव केला, त्याच दिवशी संध्याकाळपासून त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या दिनचर्येत कोणताही बदल केला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे पाचला उठून व्यायाम करून सकाळी आठ वाजता हा गडी सीमाभागातील बेडकिहाळच्या कारखान्यावर नेहमीप्रमाणे हजर राहून कामाची सुरूवात. या वयातही 7474 नंबरच्या मर्सिडिसमधून स्वतः गाडी चालवणार. पराभवाने कार्यकर्ते दुःखात बुडाले असताना अप्पा मात्र निर्धास्त अन् नेहमीप्रमाणे बिंधास्त...
Rajaram Sakhar Karkhana Election Result : माझं नाव महादेव...
भाजपात गेलेल्या धनंजय महाडिकांना गेल्या वर्षी राज्यसभेवर संधी मिळाली आणि कोल्हापुरातल्या महाडिक गटात चैतन्य निर्माण झालं. उद्या मुन्नाची मिरवणूक बघा असं अप्पांनी सांगितलं आणि त्यानंतर महाडिकांनी कोल्हापुरात काढलेल्या जल्लोषी मिरवणुकीची चर्चा राज्यभरात रंगली. "जिंकणं आणि हरणं यावर महाडिक कुटुंबाचं संकट नाही, ज्यावेळी तो (देव) संकट आणेल त्यावेळी महाडिक संकटात येईल, अन्यथा महाडिकाला कोणी संकटात आणू शकणार नाही. माझं नाव महादेव आहे.. नावच परमेश्वराचं आहे, त्याला कोणी धक्का पोहोचवू शकत नाही" अशी प्रतिक्रिया महादेवराव महाडिकांनी दिली होती.
माझ्याकडे 'शोले'मधला रुपाया, कसाही उडवा, काटाच पडणार
पुतण्या खासदार, मुलगा आणि सून राजकारणात, आणि विश्वराज महाडिकांच्या रुपाने तिसरी पीढी राजकारणात आली असली तरी आजही महाडिक गटाचा कारभार एकखांबी तंबूवर आधारित आहे आणि तो म्हणजे महादेवराव महाडिक. माझ्याकडे 'शोले'मधला रुपाया आहे, कसाही उडवा काटाच पडणार, महाडिकच जिंकणार अशी डॉयलॉगबाजी मारणारे महादेवराव महाडिक म्हणजे एखाद्या चित्रेपटातील अभिनेत्याला शोभेल असं भन्नाट व्यक्तिमत्व.
मी शेलारमामा आहे, माझ्या लांगेत कोणी बोटी घालण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी खूप पावसाळे बघितले पाहिजेत. धनंजय, अमल आहे त्यांना पहिल्यांदा सलामी द्या मग माझ्याकडे या. ज्यांना शड्डू मारायला येत नाही त्यांना शड्डू मारायला शिकवत आहेत, मी फुकून उडवून टाकेन अशी डॉयलॉगबाजी त्यांनी राजाराम कारखान्याच्या निवडणुकीवेळी केली आणि सतेज पाटलांसह संपूर्ण जिल्ह्याला त्याची प्रचीती आली. अगदी घराजवळ असलेला कारखाना सतेज पाटलांना तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीतही घेता आला नाही हे वास्तव आहे. अप्पा महाडिकांनी या कारखान्यात 28 वर्षानंतर आजही एकतर्फी बाजी मारली आहे.
मी आधी जे पेरलंय ते आता उगवायला सुरुवात झालंय असं अप्पा म्हणतात. जवळपास शरद पवारांच्या इतकं वय, आणि कामही त्यांच्यासारखंच.... संपला, संपला म्हणता हा पैलवान कुठून धरून चितपट करेल याचा काही नेम नाही. पण एकेकाळी त्यांच्याच तालमीत तयार झालेले सतेज उर्फ बंटी पाटीलही कमी नाहीत. त्यामुळे येत्या काळात कोल्हापुरातल्या राजकारणात तीच टशन.... तीच खुन्नस पाहायला मिळणार हे नक्की.
ही बातमी वाचा: