Satej Patil on Hasan Mushrif : कोल्हापूरची निवडणूक पोहोचली पोलिसांच्या दारात; मुश्रीफांच्या इशाऱ्याला सतेज पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर
देशात सध्या गढूळ वातावरण निर्माण झालं आहे. या वातावरणात शाहू महाराजांच्या रूपाने निर्णयाक भूमिका लोकांमधून दिल्लीत जावी म्हणून ते लोकसभेला उभारले असल्याचे सतेज पाटील म्हणाले.
कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur Loksabha) आमचा प्रचाराचा एक राऊंड पूर्ण झाला आहे. कोल्हापूरच्या जनतेमध्ये कोल्हापूरच्या मातीतील छत्रपतींचं व्यक्तिमत्व दिल्लीला पाठवायचं असा विचार आहे, त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आमची सीट निवडून येईल असा दावा आमदार सतेज पाटील यांनी केला. सतेज पाटील यांनी यावेळी हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या इशाऱ्यावरूनही चोख प्रत्युत्तर दिले.
सतेज पाटील म्हणाले की, आत्ता वैचारिक लढाई सुरू आहे आणि या वैचारिक लढाईमध्ये शाहू महाराजांनी उतरावे असे कोल्हापूरकरांची ईच्छा होती. देशात सध्या गढूळ वातावरण निर्माण झालं आहे. या वातावरणात शाहू महाराजांच्या रूपाने निर्णयाक भूमिका लोकांमधून दिल्लीत जावी म्हणून ते लोकसभेला उभारले असल्याचे ते म्हणाले.
मान गादीला, मत गादीला कॅम्पेन सुरु
वैयक्तिक टीका दोन्हीकडून होणे अपेक्षित नाही, आम्ही आमच्या पातळीवर सूचना दिल्या आहेत. शाहू महाराजांना लोकसभेत पाठवावं यासाठी लोक एकत्र आहेत. शाहू महाराजांचा संदर्भात चुकीचे मेसेजेस तिकडून येण्यास सुरुवात झाली. यामुळे मी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. मी स्वतः तीन दिवसापूर्वी तक्रार दिली असल्याचे ते म्हणाले. ही कोल्हापूरच्या अस्मितेची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची लढाई आहे. मान गादीला, मत गादीला असं कँपेनिंग आमचं सुरू झालं असल्याचे ते म्हणाले.
सांगलीच्या जागेचे पडसाद कोल्हापूर मध्ये नाहीत
सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सामना रंगला आहे. त्यामुळे सांगलीचे पडसाद कोल्हापूर उमटतील अशी चर्चा रंगली होती. यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूरमध्ये शिवसेना ताकतीने काम करत आहे उद्धव ठाकरे देखील शाहू महाराजांकडे येऊन गेले. मधल्या काळात भाजपच्या माध्यमातून काही अफवा पसरवल्या गेल्या. सांगलीबाबत वरिष्ठ पातळीकडून आम्ही अजूनही आशावादी आहोत, असेही ते म्हणाले. पक्षप्रमुख म्हणून ठाकरेंची भूमिका योग्य आहे, त्यांनी निर्णय घेतला आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणे काँग्रेस म्हणून आमचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
हातकणंगलेवर काय म्हणाले?
सतेज पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेने अद्याप हातकणंगलेची जागा घोषित केलेली नाही. हातकणंगले संदर्भात वरिष्ठ पातळीवर अद्याप देखील चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा केली असून सर्वांचे मत आपण राजू शेट्टींच्या बाजूने राहावे असे आहे. वंचितने उमेदवार दिला असल्याने आज किंवा उद्या याचा निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या