(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hasan Mushrif : तर आदराचं स्थान कुठे जाईल? हसन मुश्रीफांनी महाविकास आघाडीच्या प्रचारकांना भरला दम
प्रचाराची पातळी कुठपर्यंत जाणार हे माहित नसल्याने आम्ही महाराजांनी या वयात निवडणूक लढू नका असे म्हणत होतो अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) उमेदवार निश्चित झाल्यानंतर प्रचाराने वेग घेतला आहे. सतेज पाटील (Satej Patil) यांच्या खांद्यावर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) प्रचाराची धुरा आहे, महायुतीकडून (Mahayuti) हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या खांद्यावर प्रचाराची जबाबदारी आहे. दोन्हीकडून गावोगावी जाऊन प्रचार करण्यात येत आहे. मात्र, आता ही लढाई आता वैयक्तिक आरोपांवर येऊन पोहोचली आहे. हसन मुश्रीफ यांनी आज कागलमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना महाविकास आघाडीला दम भरला आहे.
हसन मुश्रीफ काय म्हणाले?
आम्ही वैयक्तिक टीका करत नाही. मात्र, संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यावर वैयक्तिक टीका करणारा व्हिडिओ भैय्या माने यांनी मला दाखवला. प्रचारात त्यांच्याकडून संजय मंडलिकांवर वैयक्तिक टीका केली जात आहे. टीका करणारे व्हिडिओ त्यांच्याकडून व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे प्रचाराची पातळी कुठपर्यंत जाणार हे माहित नसल्याने आम्ही महाराजांनी या वयात निवडणूक लढू नका असे म्हणत होतो अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना मुश्रीफ यांनी सांगितले की, निवडणुकीमध्ये शाहू महाराजांचे स्थान अबाधित राखायचं असल्यास वैयक्तिक टीका टाळावी. नाही तर आदराचे स्थान कुठे जाईल? अशी विचारणा त्यांनी केली. शाहू महाराज यांच्याबद्दल आमच्या मनात आदराचे स्थान आहे. मात्र, आमच्यावर वैयक्तिक टीका होऊ लागली आणि आम्ही प्रत्युत्तर दिलं तर हे स्थान कुठं जाईल अशी विचारणा त्यांनी केली.
ही विचारांची लढाई असून वरच्या पातळीवर काही टीका होणार असल्यास होऊ द्या, पण वैयक्तिक पातळीवर टीका नको, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
आत्मीयता आणि जिव्हाळा कधीच कमी झाला नाही
दरम्यान, काल (31 मार्च) कागलमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांना खासदार करून कागल तालुक्याचा सन्मान आणि स्वाभिमान जपूया, असे आवाहन केले. त्यांच्या मोठ्या मताधिक्याच्या विजयाच्या रुपाने लोकनेते खासदार सदाशिवरावजी मंडलिक यांना वंदन करूया, असेही ते म्हणाले. मंडलिक आणि मुश्रीफ ही दोन नावे वेगवेगळी होऊच शकत नाहीत. आम्ही अनेक वर्ष एकत्र काढली आहेत. दुर्दैवाने काही मतभेद झालेही. परंतु; मनातील आत्मीयता आणि जिव्हाळा कधीच कमी झाला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या