Kolhapur Crime : पतीसोबत भाजी विक्रीसाठी आठवडा बाजारात आलेल्या पत्नीचे अपहरण; गडहिंग्लज तालुक्यात खळबळ
Kolhapur Crime : पती लक्ष्मण नगरपरिषद आवारात भाजीपाला विकत होते, तर पत्नी होळकर चौकात भाजीपाला विकत होती. यावेळी तोंड बांधून आलेल्या दोघा अज्ञातांनी जबरदस्तीने ओमनी गाडीत घालून फरार झाले.
कोल्हापूर : आठवडा बाजारासाठी भाजीपाला विक्रीसाठी पतीसोबत आलेल्या पत्नीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) गडहिंग्लज शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या समोरील रोडवर रविवारी (17 सप्टेंबर) पहाटे पावणे सहाच्या सुमारारास ही अपहरणाची घटना घडली. लता लक्ष्मण नवलगुंदे (वय 30, रा. हेब्बाळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे त्या महिलेचं नाव आहे. भाजीपाला व्यवसाय करणारे पती लक्ष्मण शंकर नवलगुंदे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रसंग काय घडला?
लक्ष्मण आणि त्यांची पत्नी लता दोघे मिळून भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. रविवारी गडहिंग्लजमध्ये आठवडी बाजारासाठी ते पहाटेच भाजीपाला घेऊन आले होते. यावेळी त्यांच्यासोबत एक नातेवाईक महिलाही भाजी घेऊन आली होती. दोघे पती पत्नी दोन ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी बसले होते. पती लक्ष्मण नगरपरिषद आवारात भाजीपाला विकत होते, तर पत्नी होळकर चौकात भाजीपाला विकत होती. यावेळी त्यांच्यासोबत आलेली नातेवाईक महिला लघुशंकेला बाजूला गेल्यानंतर तोंड बांधून आलेल्या दोघा अज्ञातांनी लताला जबरदस्तीने ओमनी गाडीत घालून फरार झाले.
जबरदस्तीने गाडीत कोंबले, महिलेचा आरडाओरडा
जबरदस्तीने अपहरणाचा प्रयत्न झाल्यानंतर लताने आरडाओरडा केला. यावेळी बाजूला गेलेल्या नातेवाईक महिलेने हा प्रसंग लताचे पती लक्ष्मण यांना सांगितला. त्यांनी आपल्या वाहनाने पाठलाग घेत शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सापडले नाहीत. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
गेल्यावर्षीही संबंधित महिला बेपत्ता, चार दिवसांनी परतली
दरम्यान, गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात हीच महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद पतीकडून देण्यात आली होती. मात्र, चार दिवसांनी ती महिला पोलीस ठाण्यात हजर झाली होती. चंदनकूडमधील एकजण तिला त्रास देत होता. त्यामुळे विनयभंगाची तक्रारही तिने गडहिंग्लज पोलिसात दिली होती. रविवारी अपहरणाची फिर्याद दाखल केल्यानंतर पतीने ही माहिती दिली आहे.
अनैतिक संबंधाच्या वादातून दगडाने ठेचून निर्घृण खून
दरम्यान, चार दिवसांपूर्वी कोल्हापुरात अनैतिक संबंधाच्या संशयातून वाद झाल्याने मिटवामिटवी करुन घरी जात असताना पुन्हा वाद झाल्याने वन कर्मचाऱ्याचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. वन कर्मचारी भास्कर शंकर कांबळे (वय 50, रा. आणाजे, ता. राधानगरी) याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. संशयित आरोपी भाजीपाला विक्रेता असलेला युवराज बळवंत कांबळे (वय 27 रा. कुडूत्री, ता. राधानगरी) खून केल्यानंतर पोलिसांत हजर झाला.
इतर महत्वाच्या बातम्या