Kolhapur Crime: शिक्षण मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे अन् काम विनापरवाना आणलेली विदेशी दारु चोरून विकणे; पंटरसह सापडला जाळ्यात
दोन दिवसांपूर्वी तब्बल 17 लाख 28 हजार रुपयांचा उच्च प्रतीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला होता. या गुन्ह्यातील मास्टरमाईंड अनिरूध्द अरूण राऊतला मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून अटक करण्यात आली आहे.
Kolhapur Crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा (Kolhapur News) भरारी पथकाने दोन दिवसांपूर्वी तब्बल 17 लाख 28 हजार रुपयांचा उच्च प्रतीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला होता. या गुन्ह्यातील मास्टरमाईंड फरारी आरोपी गोडावून आणि मद्यसाठ्याचा मालक अनिरूध्द अरूण राऊतला मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून अटक करण्यात आली आहे. अनिरुद्धकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याचा पंटर विजय रामलाल पासवान हा फरार झाल्याची माहिती मिळाली.
पंटर विजय रामलाल पासवान हा मुळचा झारखंडमधील आहे. तो अनिरूध्दसाठी मद्यविक्री आणि पैशाचा व्यवहार पाहतो. पंटर विजय राजारामपुरी 9 वी गल्लीमधून पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींना रविवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. पळसापूरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अनिरुद्ध हा उच्चशिक्षित इंजिनिअर असून त्याने बीई मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. प्राथमिक चौकशीत कोल्हापूर शहरातील उच्चवर्गीय प्रतिष्ठित यांचे ग्राहक असल्याचा संशय आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भरारी पथकाने केलेल्या कारवाईत विक्रांत जयसिंग भोसले (वय 33, रा. 1907, ई वॉर्ड सावंत अपार्टमेंट राजारामपुरी 11 वी गल्ली कोल्हापूर) विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रँडचे 12 बॉक्ससह ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर त्याने आणखी मद्यसाठा निर्मल अपार्टमेंट राजारामपुरीमधील 12 व्या गल्लीमधील दुकानगाळ्यामध्ये असल्याचे माहिती दिली होती. त्यानंतर याठिकाणी सुद्धा छापेमारी केल्यानंतर उच्चप्रतिच्या मद्याचे विविध ब्रँडचे 23 बॉक्स मिळून आले. मद्याचे बॉक्स थर्माकोलच्या मोठ्या बॉक्समध्ये ठेवले होते. यावर 'काँच का सामान' असा सावधानतेचा इशारा असलेलं छापील लेबल लावलेलं होतं. संशयित विक्रांततकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने सदरचे गोडावूनचा आणि मद्यसाठ्याचा मालक अनिरूद्ध अरुण राऊत असल्याची माहिती दिली होती. दोन्ही ठिकाणी मिळून आलेल्या एकुण 35 बॉक्स मद्यसाठ्याची व इतर मुद्देमालासह एकूण अंदाजे किंमत 17,28,950 रुपये इतकी आहे.
सदर कारवाईत कोल्हापूर जिल्ह्याचे भरारी पथकाचे निरीक्षक पी.आर.पाटील, निरीक्षक अशोक साळोखे, दुय्यम निरीक्षक व्ही.जे.नाईक, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार, जवान विशाल भोई, सचिन लोंढे, मारूती पोवार, जय शिनगारे, राहुल गुरव, बलराम पाटील, यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सुरु असल्याची माहिती निरीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या