(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime: कोल्हापुरात विनापरवाना आयात केलेला तब्बल 17 लाखांचा उच्चप्रतीचा दारुचा साठा जप्त
कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने तब्बल 17 लाख 28 हजार रुपयांचा उच्च प्रतीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. महसूल बुडवुन आयात केलेला साठा विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याचा दिसून आला.
Kolhapur Crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने तब्बल 17 लाख 28 हजार रुपयांचा उच्च प्रतीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला. भरारी पथकाला साठ्याची माहिती मिळाल्यानंतर कोल्हापूर शहरातील सावंत अपार्टमेंट, राजारामपुरी 11 वी गल्लीत बेसमेंटमध्ये असलेल्या गाळ्यावर छापा टाकला. त्याठिकाणी परदेशातून विना परवाना केंद्र आणि राज्य सरकारचा महसूल बुडवुन आयात केलेल्या उच्चप्रतीचे विदेशी मद्य असलेल्या (स्कॉच) चा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याचा दिसून आला.
भरारी पथकाने विक्रांत जयसिंग भोसलेला (वय 33, रा. 1907, ई वॉर्ड सावंत अपार्टमेंट राजारामपुरी 11 वी गल्ली कोल्हापूर) विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रँडची 12 बॉक्ससह ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने आणखी मद्यसाठा निर्मल अपार्टमेंट राजारामपुरीमधील 12 व्या गल्लीमधील दुकानगाळ्यामध्ये असल्याचे सांगितले. याठिकाणी सुद्धा छापेमारी केल्यानंतर मद्यसाठा करण्यासाठी गोडावून केल्याचे दिसून आले. सदर ठिकाणी उच्चप्रतिच्या मद्याचे विविध ब्रँडचे 23 बॉक्स मिळून आले. मद्याचे बॉक्स थर्माकोलच्या मोठ्या बॉक्समध्ये ठेवले होते. यावर 'काँच का सामान' असा सावधानतेचा इशारा असलेलं छापील लेबल लावलेलं होतं.
संशयित विक्रांततकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे गोडावूनचा आणि मद्य साठ्याचा मालक अनिरूद्ध अरुण राऊत असल्याचे सांगितले. अरुण राऊत फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दोन्ही ठिकाणी मिळून आलेल्या एकुण 35 बॉक्स मद्यसाठ्याची व इतर मुद्देमालासह एकूण अंदाजे किंमत 17,28,950 रुपये इतकी आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरु असल्याचे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदर कारवाईत कोल्हापूर जिल्हाचे भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील, निरीक्षक अशोक साळोखे, नंदकुमार देवणे, जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक, व्ही.जे. नाईक, दुय्यम निरीक्षक, धनाजी पोवार, श्रीमती उमा पाटील तसेच जवान विशाल भोई, सचिन लोंढे, मारूती पोवार, जय शिनगारे, राहुल गुरव, जयदीप ठमके, शंकर मोरे, श्रीमती सविता हजारे, वैभव शिंदे, बलराम पाटील, सचिन काळेल यांनी सहभाग घेतला.
8 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त
दरम्यान, चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात गडहिंग्लज-आजरा रोडवर हिरलगे फाट्यावर हिरलगे गावच्या हद्दीत (ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर) तब्बल आठ लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली होती. दारू वाहतूक करणाऱ्या वाहनासह 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने केली. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या