(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajarshi Shahu Maharaj: ऐश्वर्याचा त्याग अन् आयुष्याच्या उत्तरार्धात दलित, मागासांच्या कल्याणाचा निर्धार; मृत्यूच्या बाहुपाशात विसावले तेव्हा शाहू महाराज कोठे होते?
Rajarshi Shahu Maharaj: राष्ट्र केवळ राजकीय स्वातंत्र्याने मोठे होत नाही, तर ते समतेच्या पायावर उभे केल्याने मोठे होते. त्यासाठी ऐक्य आणि सर्व जाती धर्मात बंधूभाव पाहिजे असे शाहू महाराजांचे मत होते.
Rajarshi Shahu Maharaj: शोषित वंचितांच्या हक्कांसाठी सामाजिक लढाई लढण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेला, समतेला अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी 6 मे 1922 रोजी देह ठेवला. या लोकराजाच्या स्मृतीशताब्दी वर्षात त्यांच्या कार्याचा जागर कोल्हापुरात करण्यात आला. या स्मृतीशताब्दी वर्षाची सांगता उद्या (6 मे) रोजी होत आहे. लोकराजाचा कार्याचा वारसा चिरंतन स्मरणात राहण्यासाठी उद्या सकाळी 10 वाजता संपूर्ण कोल्हापूर 100 सेकंद स्तब्ध राहणार आहे. शाहू महाराजांचा देदीप्यमान विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसा महाराष्ट्रासह देश विदेशात घरोघरी पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहासकार डाॅ. जयसिंगराव पवार लिखित 'राजर्षी शाहू छत्रपती : एक समाजक्रांतिकारी राजा' ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. या चरित्राचा अनुवाद रशियन आणि इटालियन भाषेत करण्यात आला आहे. या अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन उद्या सकाळी अकरा वाजता शिवाजी विद्यापीठात सिनेट सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते होईल.
ज्येष्ठ इतिहासकार डाॅ. जयसिंगराव पवार यांनी शाहू महाराज मुलगा प्रिन्स शिवाजी यांच्या निधनानंतर कसे कोसळून गेले होते, तब्येत बरी नसतानाही बडोद्यापर्यंत केलेला प्रवास अन् परतीच्या प्रवासात मुंबई मुक्कामी त्यांनी घेतलेला अखेरचा श्वास याबाबतचा प्रसंग 'राजर्षी शाहू छत्रपती महाराज 'या पुस्तकातून मांडला आहे.
बलदंड शरीरयष्टी लाभलेल्या शाहू महाराजांना वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल करत असताना मधुमेह आणि हृदयरोगाने ग्रासले होते. शरीर आजाराविरोधात लढत असतानाच त्यांचे धाकटे पुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या निधनाने ते खचले होते. त्यामुळे राजवाड्यातील ऐश्वर्याचा त्याग करून ते सोनतळी आश्रमात संन्यस्त वृत्तीने राहत होते. महाराजांनी राहिलेले सर्व आयुष्य दलित मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी खर्च करण्याची प्रतिज्ञा केली होती. शोषित वंचितांसाठी लढत असताना उच्चवर्णीयांकडून महाराजांसह त्यांच्या कुटुंबियांची बदनामी सुद्धा सुरु होती. त्यामुळे अनेक पातळीवर त्यांचा संघर्ष सुरु होता.
सलग प्रवास आणि अस्पृश्य परिषदेला परिस्थिती
शाहू महाराजांनी विपरित परिस्थितीमध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते पुण्यात शिवछत्रपतींचे स्मारक पायाभरणी समारंभ यशस्वी केला तो दिवस होता 19 नोव्हेंबर 1921. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथील अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारून डॉक्टर आंबेडकरांचा आदर्श अस्पृश्यांनी नजरेसमोर ठेवा, म्हणून आवाहन केले तो दिवस होता 16 फेब्रुवारी 1922. यानंतरही शाहू महाराजांचा प्रवास सलग सुरुच होता.
सयाजीराव गायकवाडांच्या नातीच्या लग्नाला पोहोचले
शाहू महाराजांनी प्रकृती ढासळत असतानाही महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातीच्या विवाहासाठी बडोद्यामध्ये पोहोचले होते. या प्रवासात त्यांची तब्येत आणखी खालावली. परतीच्या प्रवासामध्ये मुंबई मुक्कामी 5 मे 1922 रोजी हृदयरोगाने गंभीर रूप धारण केले आणि पहाटे सहा वाजता दीनदुबळ्यांचा कैवारी, समतेचा राजा महामानव मृत्यूच्या बाहुपाशात विसावला तो दिवस होता 6 मे 1922. दुसऱ्या दिवशी पंचगंगेच्या तीरावर शिवाजी वैदिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी केलेल्या वैदिक मंत्रोच्चारात हा महामानव पंचत्वात विलीन झाला. शिवछत्रपतींनंतर शाहू छत्रपती यांच्याएवढा कर्तृत्ववान धैर्यशाली दुरदृष्टीचा पराक्रमी राजा महाराष्ट्राने पाहिला नव्हता.
त्यांच्या निधनानंतर अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही अनेक प्रांतांमध्ये शाहू महाराजांना ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. शाहू महाराजांनी मागासांच्या कल्याणासाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी हयातभर संघर्ष केला. राष्ट्र केवळ राजकीय स्वातंत्र्याने मोठे होत नाही, तर ते समतेच्या पायावर उभे केल्याने मोठे होते. त्यासाठी ऐक्य आणि सर्व जाती धर्मात बंधूभाव पाहिजे असे त्यांचे मत होते. आपला धर्म कोणताही असो तो राष्ट्रहिताच्या आड येणार नाही असे शाहू महाराजांना वाटत असे.
नागपूरच्या एका सभेत शाहू महाराज म्हणाले होते की, आम्ही सर्व हिंदी आहोत. बंधू आहोत. हिंदी प्रजाजन कोणत्याही वर्णाचे, धर्माचे असोत ते सर्वप्रथम हिंदी आहेत. व्यक्तीच्या दृष्टीने धर्म ही बाब महत्त्वाची आहे, पण राष्ट्रीय बाबतीत तो केव्हाही आड येता कामा नाही. देशाची सेवा म्हणजेच देश बंधूंची सेवा करणे. जनी जनार्दन शोधणे आणि पाहणे हाच खरा धर्म आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :