ED Raid : ईडीकडून कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माजी संचालकांची सुद्धा चौकशी
ED Raid : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर छापेमारी केल्यानंतर (KDCC ED Raid) ईडीकडून आणखी तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली. ‘ब्रीक्स’ कंपनीच्या कर्जप्रकरणात ही चौकशी झाल्याचे समजते.
KDCC ED Raid : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर छापेमारी केल्यानंतर (KDCC ED Raid) ईडीकडून आणखी तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, अनिल पाटील व विलास गाताडे या तिघांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेणाऱ्या ‘ब्रीक्स’ कंपनीच्या कर्जप्रकरणात ही चौकशी झाल्याचे समजते. कर्ज प्रकरणातील सहभागी सर्जेराव पाटील, अनिल पाटील व विलास गाताडे या तिघांना समन्स बजावून मुंबईत ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. दरम्यान, बँकेच्या मागील संचालक मंडळातील या कर्जप्रकरणाशी संबंधितांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीची छापेमारी
या महिन्यात 1 फेब्रुवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जिल्हा बँकेची शाखा, तसेच गडहिंग्लज तालुक्यातील हरळीमधील 'गोडसाखर'ला (अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना) लागून असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापेमारी (KDCC ED Raid) केली होती. यावेळी तब्बल 30 तास छापेमारी केल्यानंतर बँकेच्या पाच अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेत मुंबईला नेऊन चौकशी केली होती. ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांची 70 तासांनी ईडीने सुटका केली होती.
ईडीकडून कोल्हापूर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर आणि राजू खाडे यांना समाज बजावून ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यापूर्वी, 11 जानेवारी रोजी ईडीने हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Raid) यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना 2013-14 मध्ये ‘ब्रीक्स’ कंपनीने भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला होता. 2015 पर्यंत त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्जपुरवठा घेतल्यानंतर 2015 नंतर त्यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली. या कालावधीत कंपनीने घेतलेल्या कर्जाबाबत ‘ईडी’चा आक्षेप आहे.
हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या जामीनाला विरोध
दुसरीकडे ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ईडीकडून मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करण्यात आला आहे. ईडीने तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला कडाडून विरोध करताना म्हटले आहे की, त्यांनी चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेलं नाही. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावूनही ते हजर झालेले नाहीत. जामीन दिल्याने चौकशीवर परिणाम होईल, असेही ईडीने म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या