Sanjay Raut : शिवसेना होती म्हणून भाजपचे बालेकिल्ले सुरक्षित, इथून पुढे भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उद्ध्वस्त करु; संजय राऊतांचा एल्गार
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला तगडा हादरा दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी हा निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी असल्याचे म्हटले आहे.
Sanjay Raut News : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला तगडा हादरा दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस (Sanjay Raut on Devendra Fadnavis) यांना आता कळाले असेल, की खरी शिवसेना कुठे आहे असा टोलाही त्यांनी लगावला. कसबा पोटनिवडणुकीत आम्हाला बेगाने के शादी में अब्दुल्ला दिवाना झाल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला. संजय राऊत म्हणाले की, चिंचवडमध्ये तिसरा उमेदवार उभा करुन भाजपने मतांची फाटाफूट केली. भाजपबरोबर आतापर्यंत शिवसेना होती, म्हणून भाजपचे बालेकिल्ले सुरक्षित होते. इथून पुढे भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उद्ध्वस्त करु.
"कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यांनी 11 हजारांवर मतांनी पराभवाची धूळ चारली. दरम्यान, राऊत यांनी शिंदे गटावरही जोरदार प्रहार करत टीकास्त्र सोडले. सध्या महाराष्ट्रात चोरमंडळामुळे जे वातावरण आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाही. जिथे जाऊ तिथे आधीपेक्षा जास्त उत्साह दिसत असल्याचे ते म्हणाले. लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिका होऊ द्या, महाविकास आघाडीच्या मागे संपूर्ण जनता ठामपणे उभी आहे. भाजप हा बुडबुडा आलेला पक्ष आहे," असं संजय राऊत म्हणाले.
डुप्लिकेट शिवसेनेचा किती प्रभाव आहे याचा बुरखा फाटला
या निवडणुकीतून डुप्लिकेट शिवसेनेचा किती प्रभाव आहे याचा बुरखा फाटल्याचा टोला त्यांनी लगावला. त्यांनी सांगितले की, "एकास एक लढत झाली असती, तर चिंचवडमध्येही चित्र वेगळ असतं. भाजपचा पराभव करायचा हे लोकांनी आता ठरवलं. विधीमंडळाला अधिकार आहेत तसेच आम्हालाही पक्ष फोडणाऱ्यांवर बोलण्याचा अधिकार आहे."
हक्कभंग नोटीसवर संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊतांविरोधात हक्कभंग समिती नेमण्यात आली आहे. याबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी मला समितीबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले. मात्र, नोटीस मिळाली असल्याचे म्हणाले. घरी नोटीस देण्यात आली असून मी नोटीस वाचली नाही. लोक चोर आणि डाकू म्हणतात, पण मी म्हणत नाही. पुन्हा तुरुंगात पाठवत असतील तर पाठवू द्या मी घाबरत नाही. मी तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. कागदावरच्या लढाया मी लढत नाही." "सरकार तुमचं आहे, मला संरक्षण असेल तर काढा, अशा फालतू धमक्या मला देऊ नका," असे आव्हान त्यांनी दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या