Jayant Patil on Sanjay Mandlik : आजऱ्यातील उचंगी प्रकल्पाचे लोकार्पण, जयंत पाटलांकडून संजय मंडलिकांना खोचक टोला!
कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी (ता. आजारा) येथे बांधलेल्या उचंगी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. आमदार जयंतर पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणीपूजनाचा सोहळा पार पडला.
Jayant Patil on Sanjay Mandlik : कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी (ता. आजारा) येथे बांधलेल्या उचंगी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंतर पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणीपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील उपस्थित होते. यावेळी राजकीय टोलेबाजी सुद्धा चांगलीच रंगली.
पाणीपूजन कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले की, गेल्या पंचवार्षिकमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी पाटबंधारे प्रकल्प रखडलेलेच होते. हसन मुश्रीफ यांनी या सर्वच पाटबंधारे प्रकल्पांना चालना दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पांना पुरेसा निधी मिळण्यासाठी ते सातत्याने आग्रही राहिले. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच प्रकल्प पूर्ण होत आले आहेत. आज उचंगी प्रकल्पाचे पाणी पूजन होत असताना समाधानाची भावना आहे. प्रकल्पग्रस्तांचे उरलेले प्रश्नही मार्गी लावू, असे ते म्हणाले.
जयंत पाटलांचा टोला अन् संजय मंडलिकांकडून पहाटेची शपथेची तयारी
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी खासदार मंडलिक राज्यात आताचे सरकार आहे तोपर्यंत शिंदे गटात राहतील त्यानंतर ते आमच्या सोबत असतील असे म्हणताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या व हास्यकल्लोळ झाला. यावेळी व्यासपीठावरून मंडलिक यांनीही प्रत्युत्तर देत असं झाल्यास आपण पाच वाजता जाऊन राज्यपालांकडे शपथ घेऊ असे सांगितले. त्यामुळे व्यासपीठावर हास्यकल्लोळ रंगला.
यावेळी बोलताना माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले की, उचकी प्रकल्पाचे आज पाणी पूजन होत आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेचे सगळं श्रेय प्रकल्पग्रस्तांना जाते. काळजाचा तुकडा असलेल्या जमिनी त्यांनी प्रकल्पासाठी दिल्यामुळेच हा प्रकल्प पूर्णत्वाला जात आहे, अशी कृतज्ञतेची भावनाही त्यांनी व्यक्त केली. गेली 25 - 26 वर्ष रखडलेल्या या प्रकल्पासाठी हेक्टरी 40 लाखाप्रमाणे बाजारभावाने जमिनीचा मोबदला देण्यासाठी तरतूद केली. शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी हमीही त्यांनी यावेळी दिली.
खासदार संजय मंडलिक म्हणाले की, पाण्याचा वापर शेतीसाठी व्हावा, ही राजर्षी शाहू महाराजांची शिकवण आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा जलसंपदा खात्याचा मोठा फायदा कोल्हापूर जिल्ह्याला झाला, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार राजेश पाटील, कॉम्रेड संजय तरडेकर यांचीही मनोगते झाली.