कारखान्याच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथे मेळावा घेत टीकेचे झोड उठविताना राजाराम कारखान्याच्या सातबारावर अमल महाडिक यांचे नाव लागेल, असा आरोप केला होता. यावर महाडिक यांनीही आक्रमकपणे पलटवार करून, ‘राजाराम कारखान्याच्या सातबारावर नाव लावायला मी काही सतेज पाटील नाही, असे प्रत्युतर दिले होते.
दुसरीकडे राजाराम सहकारी साखर कारखान्याचे बोगस व कार्यक्षेत्राबाहेरील 1346 सभासदांना अपात्र ठरवण्यात आल्याने सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला तगडा झटका बसला आहे. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून विरोधक सतेज पाटील गटाला या निर्णयाने मोठे बळ मिळाले आहे.
बोगस व कारखाना कार्यक्षेत्रा बाहेरच्या 1346 सभासदांना प्रादेशिक सहसंचालक आणि तत्कालीन सहकार पणन मंत्री यांनी अपात्र ठरविले होते. त्या 1346 सभासदांच्या अपात्रतेवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने सत्तारुढ गटाला धक्का बसला आहे. या निर्णयाचा सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. सभासदांबाबत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीकडून एकूण 1 हजार 899 हरकती दाखल केल्या होत्या. याबाबतची सुनावणी कोल्हापूरच्या प्रादेशिक सहसंचालकांनी घेऊन 484 सभासद पात्र ठरविले होते. यापैकी मृत व दुबार असे 69 वगळून अपात्र 1008 व कार्य क्षेत्राबाहेरील 338 अशा 1346 सभासदांना प्रादेशिक सहसंचालकांनी अपात्र ठरविले होते.
मुंबई उच्च न्यायालयानेही अपील फेटाळले
या अपात्र सभासदांनी तत्कालीन सहकार व पणन मंत्री यांच्याकडे अपील दाखल केले होते. याबाबत त्यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनीही अपात्र सभासदांचे व कारखान्यांनी केलेले अपील फेटाळून लावले व प्रादेशिक सहसंचालकांचा 14 फेब्रुवारी 2020 रोजी दिलेला निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर या अपात्र सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मे. सी. व्ही. भडंग यांचेसमोर याबाबतची सविस्तर सुनावणी झाली. त्यांनी या 1346 अपात्र सभासदांचे अपिल फेटाळून लावत आदेश कायम ठेवला. छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. रवि कदम, ॲड. पी. डी. दळवी, ॲड. केदार लाड यांनी काम पाहिले.
राजाराम कारखान्यावर गेल्या 28 वर्षांपासून महाडिकांची सत्ता
दरम्यान, राजाराम कारखान्यावर गेल्या 28 वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे. त्यामुळे कारखान्यात सत्तांतर करण्यासाठी सतेज पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये थोड्या फरकाने सतेज पाटील पॅनेलचा पराभव झाला होता.