Kolhapur News: मध्यरात्री प्रेयसीने भेटायला बोलावले, पण तिच्या घरच्यांना सापडताच बांधून घातला, पळून जाण्याच्या नादात विहिरीत कोसळून जीव गेला
शुभंकरने अंधारातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावातील लोकांनी त्याला पकडण्यासाठी पाठलाग सुरु केला. मध्यरात्रीच्या अंधारात पळताना रस्ता ओलांडून जात असताना विहीर न दिसल्याने पाण्यात कोसळला.
Kolhapur News: मध्यरात्री प्रेयसीने प्रियकराला भेटायला बोलावल्यानंतर सापडल्याने पळून जाताना विहिरीत कोसळून जीव गमावल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात घडली. शुभंकर संजय कांबळे (वय 17, रा. वाकीघोल, ता. राधानगरी, जि.कोल्हापूर) असे मृत प्रियकराचे नाव आहे. प्रेयसीने घरी आपल्या कोणीच नसल्याचे पाहून प्रियकराला मध्यरात्री बोलवून घेतले. मात्र प्रेयसीच्या घरची मंडळी बाहेर गेलेली परत आल्यानंतर दोघेही एकत्र दिसले. यानंतर प्रेयसीच्या कुटुंबीयांना प्रियकराला दोरीने आंब्याच्या झाडाला बांधून ठेवले. यानंतर हिसडा मारून पळून जात असताना ग्रामस्थ पाठीमागे लागल्याने वाटेत त्याला विहीर न दिसल्याने तो थेट विहीरीत कोसळला. या घटनेत त्याचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
प्रियकर सापडताच अंब्याच्या झाडाला बांधून घातले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री पाचर्डे येथील अल्पवयीन प्रियसीने प्रियकराला घरी बोलावले. तो तिला भेटायला आला होता. रात्री अडीचच्या सुमारास बाहेर गेलेले तिच्या घरची मंडळी घरी आली. त्यावेळी आनंदा ज्ञानू कांबळे यांच्या घराशेजारी प्रेयसी आणि प्रियकर झाडाखाली उभे होते. यावेळी त्या दोघांना अशोक गोविंद कांबळे यांनी बाजूला केले. रंगराव कांबळे व संजय कांबळे यांनी प्रियकर शुभंकरच्या उजव्या हाताला दोरी बांधून गोविंद कांबळे यांच्या दारातील आंब्याच्या झाडाला बांधून घातले. त्यानंतर याची माहिती गावच्या पोलिस पाटील शिल्पा कांबळे यांना दिली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पळून जाताना विहिरीत कोसळला
मयत शुभंकरने पहाटे पावणे तीनच्या सुमारास हाताला हिसडा मारुन तेथून अंधारातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावातील लोकांनी त्याला पकडण्यासाठी पाठलाग सुरु केला. मध्यरात्रीच्या अंधारात पळताना रस्ता ओलांडून जात असताना विहिर न दिसल्याने पाण्यात कोसळला. त्यामुळे त्याचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला.
फेसबुकवर जुळल्याने तरुणी पनवेलहून कोल्हापुरात
दरम्यान, पनवेलमधील अल्पवयीन मुलीची फेसबुकच्या माध्यमातून ओळख कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कोपार्डेमधील एका अल्पवयीन तरुणाशी झाली. गेल्या एक वर्षांपासून चॅटिंगच्या माध्यमातून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. याच प्रेमातून ती संबंधित अल्पवयीन मुलगी कोपार्डेत येऊन पोहोचली. मुलगी थेट घरी पोहोचल्याने गावातही चांगलीच चर्चा रंगली. अशिक्षित असलेल्या आई वडिलांनी मुलाच्या प्रेमामुळे त्याच्या थेट लग्नाची तयारी सुरु केली. लग्नाची तयारी सुरु असतानाच मुलीची आई पनवेल पोलिसांना घेऊन कोल्हापुरात पोहोचली. तेथून त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात प्रकरणाची माहिती दिली. यावेळी पोलिसांना त्या मुलीने स्वत:हून कोपार्डेत पोहोचल्याचे पोलिसांना सांगितले. संबंधित मुलाच्या आई वडिलांची परिस्थिती पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना विनवणी केली. पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेत करवीर पोलिस स्टेशनला आले. यानंतर पोलिसांनी चौकशी करून संबंधित मुलीला पनवेल पोलिसांच्या स्वाधीन केले आणि फेसबुक प्रेमावर पडदा पडला.
इतर महत्वाच्या बातम्या