Helmets Compulsory in Kolhapur: गुजरातमधील हेल्मेट कंपनीच्या फायद्यासाठी कोल्हापुरात हेल्मेट सक्ती; शिवसेना ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Helmets Compulsory in Kolhapur: रस्त्यांचा दर्जा, अवैज्ञानिक पद्धतीने असलेले स्पीड ब्रेकर तसेच हेल्मेट काढून होणाऱ्या चेंज स्नॅचिंगच्या घटनांवरून शिष्टमंडळाकडून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं.
Helmets Compulsory in Kolhapur: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी, खासगी आस्थापन महाविद्यालयामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. मात्र हेल्मेट सक्तीला कोल्हापुरातून विरोध होत आहे. कोल्हापुरात आज (23 मे) शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेत हेल्मेट सक्तीला विरोध केला. आधी चांगल्या दर्जाचे रस्ते करा, मग हेल्मेट सक्ती करा अशी भूमिका यावेळी ठाकरे गटाने घेतली.
रस्त्यांचा दर्जा, अवैज्ञानिक पद्धतीने असलेले स्पीड ब्रेकर तसेच हेल्मेट काढून होणाऱ्या चेंज स्नॅचिंगच्या घटनांवरून शिष्टमंडळाकडून अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरण्यात आलं. गुजरातमधील हेल्मेट कंपनीच्या फायद्यासाठी कोल्हापुरात हेल्मेट सक्ती होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. दरम्यान, कोल्हापूरमध्ये हेल्मेट वापरण्याबाबत येत्या काळात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रबोधन केलं जाणार असून यावर मार्ग निघेल असा विश्वास परिवहन अधिकारी रोहन काटकर यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे, जिल्ह्यात सोमवारी 22 मेपासून हेल्मेट सक्ती लागू झाली आहे. तथापि, पहिल्या दिवसांपासून कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात येणार नसून जनजागृती केली जाणार आहे. प्रशासनाकडून पहिल्या आठ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. त्यानंतर मात्र हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना 1000 रुपये करणार दंड करण्यात येणार आहे. दुचाकीस्वार ज्या संस्थेत, कार्यालयात, कंपनीत काम करतो त्या मालकासही होणार 1000 रुपये दंड करण्यात येणार आहे. मोटार वाहन कायदा, 1988 मधील कलम 194 ड मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदींचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद आहे.
तसेच ज्या आस्थापना आहेत किंवा त्यांचे कार्यालय प्रमुख आहेत त्यांनाही 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी आस्थापना आणि महाविद्यालये असे तीन विभाग घेतले आहेत. या सर्वांना नोटीस पाठवल्या जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एकूण रस्ते अपघातामध्ये 70 ते 80 टक्के अपघात दुचाकी व पादचाऱ्यांचे आहेत. रस्ते सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही अतिशय चिंताजनक बाब आहे. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनाच्या अपघातांमध्ये जखमी अथवा मृत वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे आहेत. त्यामुळे हेल्मेटसाठी व्यापक मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या