Kolhapur : वाढदिनी घरात केक कापला अन् बाळूमामाचा प्रसाद घेऊन येतो म्हणून बाहेर पडला अन् वाटेतच धावत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने काळाचा घाला
धावत्या दुचाकीवर कोसळून आकाश आण्णाराव धनवडे (वय 26) या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. घरात वाढदिवस तसेच लग्नाची बोलणी सुरु असतानाच एकुलत्या मुलावर काळाचा घाला आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) गडहिंग्लजमध्ये (Gadhinglaj) वादळी पावसाने वाढदिनीच अविवाहित तरुणावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली. प्रचंड वादळी वाऱ्याने बाभळीचे झाड कोसळून थेट धावत्या दुचाकीवर कोसळून आकाश आण्णाराव धनवडे (वय 26 वर्षे) या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. घरात वाढदिवस असल्याने उत्साहाचे वातावरण तसेच लग्नाची बोलणी सुरु असतानाच एकुलत्या मुलावर काळाचा घाला आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली.
आकाशचे वडील आण्णाराव सैन्य दलातून निवृत्त होऊन रेल्वे पोलिसमध्ये होते. या सेवेतूनही 15 दिवसांपूर्वी ते निवृत्त होऊन गावाकडे आले आहेत. आकाशच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे. आकाश हा एकुलता एक होता. वडिलांनी निवृत्तीनंतर गावी राहण्याचा बेत करून त्यांनी घराचे आणि आकाशच्या लग्नाचे नियोजन केले होतो. अशावेळी नियतीने दिलेल्या धक्क्याने कुटुंब कोलमडून गेले आहे.
सोमवारी रात्री गडहिंग्लज शहरासह तालुक्यात जोरदार वळीव पाऊस झाला. यावेळी वादळी वाऱ्याने भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील आकाश मृत्यूमुखी पडला. सोमवारी रात्री साडे आठपासून वादळी वारा तसेच विजांचा कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. आकाश गडहिंग्लजहून मोटारसायकलने गावाकडे जात असताना गावच्या वेशीपासून हाकेच्या अंतरावर असतानाच धावत्या दुचाकीवर बाभळीचे झाड कोसळले. घटनेची माहिती समजताच नागरिक मदतीसाठी धावले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, झाड कोसळून छातीला मार लागल्याने त्याचा करुण अंत झाला.
आठ दिवसांपूर्वी सुट्टीसाठी गावाकडे
आकाश पुण्यामध्ये नोकरीस होता. आठ दिवसांपूर्वीच तो सुटीवर आला होता. सोमवारी 22 मे रोजी वाढदिवस असल्याने घरी त्याच्या केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर आकाशने गडहिंग्लजला जाऊन येतो, तसेच गावात येऊन रात्री बाळूमामाचा प्रसाद घेऊन येतो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. परंतु, गडहिंग्लजहून परत येतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला.
15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेची आत्महत्या
दरम्यान, जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील निवडेमधील अवघ्या 15 दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या नवविवाहिताने घरी कोणीही नसताना आत्महत्या केल्याची घटना घडली होती. भाग्यश्री अक्षय प्रभावळे (वय 22 वर्षे) असे त्या नवविवाहितेचं नाव आहे. घरातील पंख्याला ओढणीने गळफास तिने आयुष्याचा शेवट केला. अवघ्या 15 दिवसांपूर्वी विवाह झाल्याने प्रभावळे कुटुंब आनंदात असतानाच भाग्यश्रीच्या टोकाच्या निर्णयाने कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. भाग्यश्रीने नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली? याबाबत माहिती मिळालेली नाही. निगडेमधील अक्षय प्रभावळेशी भाग्यश्रीचा अवघ्या 15 दिवसांपूर्वीच विवाह झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या