Hasan Mushrif : आमदार हसन मुश्रीफांच्या समर्थनार्थ कागलमधील हजारो शेतकरी थेट ईडी कार्यालयात
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावरून मुरगुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या स्पष्टीकरणासाठी कार्यक्षेत्रातील एक हजारहून अधिक शेतकरी ईडी कार्यालयात पोहोचले.
Hasan Mushrif: माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी कागलमधील हजारो शेतकरी आज (23 मार्च) मुंबईत ईडी कार्यालयात दाखल झाले. संजय चितारी आणि युवराज पाटील यांच्यासह हजारो शेतकरी ईडी कार्यालयात दाखल झाले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावरून मुरगुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या स्पष्टीकरणासाठी कार्यक्षेत्रातील एक हजारहून अधिक शेतकरी ईडी कार्यालयात पोहोचले.
हसन मुश्रीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेल्या विवेक कुलकर्णीसह 16 जणांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने वस्तुस्थितीचा खुलासा करण्यासाठी शेतकऱ्यांनी ईडी कार्यालयावर धडक मारली. यापूर्वी, विवेक कुलकर्णींविरोधातही खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, आज (23 मार्च) कोल्हापूरमध्ये आणखी 25 शेतकऱ्यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दाखल केली आहे. या सर्व दाखल गुन्ह्यांचा आणि तक्रारींचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणकडून करण्यात येणार आहे.
मुरगुडमधील प्रकरणात मुश्रीफांना दिलासा
दरम्यान, ईडीच्या छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालाने आदेश दिले आहेत. मुरगूडमध्ये दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दुसरीकडे हसन मुश्रीफांवर सातत्याने आरोप केलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने तगडा झटका दिला आहे. याप्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा खडा सवाल न्यायालयाने केला. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :