Kolhapur News: बनावटगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्याला आम्ही उरावर बसवून घेणार नाही; कोल्हापुरात ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
बनावटगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्याला आम्ही उरावर बसवून घेणार नाही, आमचे खांदे सुद्धा मजबूत आहेत, कोणाला उरावर घ्यायचं आणि कुणाला पाया ठेवायचे हे आम्ही ठरवू असा इशारा हर्षल सूर्वे यांनी वरिष्ठांना दिला.

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी रविकरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर पोहोचला आहे. इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी निवड होताच त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास हर्षल सुर्वे यांनी नकार दिला आहे. बनावटगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्याला आम्ही उरावर बसवून घेणार नाही, आमचे खांदे सुद्धा मजबूत आहेत, कोणाला उरावर घ्यायचं आणि कुणाला पाया ठेवायचे हे आम्ही ठरवू असा इशारा हर्षल सूर्वे यांनी पक्षातील वरिष्ठांना दिला. त्यामुळे आता शिवसेनेच्या फुटीनंतर जिल्ह्यामध्ये शिवसेना खिळखळी झाली असताना आता पदाधिकाऱ्यांमधील वादांमुळे पक्षाला सातत्याने वादाने ग्रासले आहे.
काँग्रेस ठाकरे गटाच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत असेल तर
हर्षल सुर्वे यांनी आपल्या नावाला काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विरोध केला असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ठाकरे गटाच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत असेल तर त्यासारखं दुर्दैव नसल्याचे म्हणत हर्षल सुर्वे यांनी इंगवले यांच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण जबाबदारी मागितलीच नव्हती त्यामुळे ती घेणार नसल्याचा हर्षल सुर्वे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गटातील वाद चांगलाच चर्चेत
दरम्यान सुर्वे यांनी इतर पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी बोलून पुढील दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार असल्याचे म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटातील वाद चांगलाच चर्चेत आहे. यापूर्वी शिवसेना उपनेते संजय पवार आणि रविकिरण इंगवले यांच्यामधील सुद्धा वादाने टोक गाठले होते. शिवसेना फुटीनंतर कोल्हापूरमध्ये शिवसैनिक पदाधिकारी एका बाजूला आणि नेते एका बाजूला अशी स्थिती असताना पदाधिकाऱ्यांमधील वाद हा पक्षाला मार्ग ठरत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























