Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
चालकाने आजूबाजूच्या कामगारांना कोणतीही पूर्वसूचना किंवा इशारा न देता निष्काळजीपणे बस सुरू करून पुढे घेतली, ज्यामुळे पांडुरंग चव्हाण चाकाखाली सापडले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Kolhapur News: कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील (CBS) एसटी कार्यशाळेत (डेपो) रॅम्पवर काम करून बाहेर येत असताना एसटी बसखाली चिरडून एका कामगाराचा मृत्यू झाला. चालक आणि बस पुढे घेण्यासाठी सूचना देणाऱ्या व्यक्तीच्या बेदरकारपणाचा निष्पाप जीव चिरडला गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं आहे. पांडुरंग आण्णाप्पा चव्हाण (वय 54 वर्षे, रा. भादोले, ता. हातकणंगले) असे दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. त्यांचा मुलगा आकाश पांडुरंग चव्हाण (वय 32) याने दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात बसचालक सिकंदर मणेर (रा. घुणकी, ता. हातकणंगले) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी कशी घडली घटना?
शनिवारी सकाळी 11 वाजता पांडुरंग चव्हाण हे एसटी डेपोच्या कार्यशाळेत बस क्रमांक (MH-14-BT-1956) वर काम पूर्ण करून रॅम्पमधून बाहेर येत होते. त्यावेळी चालकाने आजूबाजूच्या कामगारांना कोणतीही पूर्वसूचना किंवा इशारा न देता निष्काळजीपणे बस सुरू करून पुढे घेतली, ज्यामुळे पांडुरंग चव्हाण चाकाखाली सापडले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नातेवाईकांकडून घातपाताचा संशय
दरम्यान, नातेवाइकांना घटनेची माहिती देताना मृतदेह थेट सीपीआर (CPR) रुग्णालयात हलवल्यामुळे सुरुवातीला नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. सीसीटीव्ही फुटेजवरून एसटी प्रशासनाने सुरुवातीला टाळाटाळ केली, मात्र जाब विचारल्यानंतर दोन तासांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेज उपलब्ध करून दिले. या फुटेजमध्ये चालकाने कोणतीही सूचना न देता बस पुढे नेल्याचे स्पष्ट दिसल्याने चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे उघड झाले.
सखोल चौकशीची मागणी
मृताचा मुलगा आकाश चव्हाण यांनी सर्व संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी






















