Ichalkaranji Ganesh Immersion : इचलकरंजीत कृत्रिम कुंडात गणेश मूर्तींचे विसर्जन होणार, पंचगंगेत विसर्जन होणार नाही
Kolhapur : इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन होणार नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून नदी मार्गावर कृत्रिम जलकुंड उभारण्याचा निर्णय महापालिकेत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला.
Ichalkaranji Ganesh Immersion : इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन होणार नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून नदी मार्गावर जास्त खोलीचे कृत्रिम जलकुंड उभारण्याचा निर्णय महापालिकेत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. महापालिकेने त्याची तत्काळ कार्यवाही सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंचगंगा नदीमध्येच विसर्जन करणार, म्हणून अडून बसलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी कृत्रिम कुंडाला सहमती दिली. दरम्यान, शिवतीर्थ ते नदीवेस नाका विसर्जन मिरवणुकीचा मार्ग कायम ठेवला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णयही बैठकीत झाला.
कोणत्याही परिस्थितीत शहापूर खाणीत मूर्ती विसर्जित करणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार आवाडे यांनी घेतली होती. दरम्यान, काल झालेल्या प्रशासकीय बैठकीमध्ये मूर्ती विसर्जनासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. शहापूर खाणीला विरोध करत त्या ठिकाणी मूर्ती विसर्जन करणार नसल्याचे आवाडे म्हणाले. त्यांनी पर्यावरणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमधील चर्चेला तपशील सांगत सक्षम पर्यायी यंत्रणा उभी केल्यास त्याला सहकार्य करण्यात असे ते म्हणाले.
पंचगंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जन करता येणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर अन्य पर्याय तयार करण्यावर एकमत झाले. यामध्ये नदीवेस नाक्यापासून यशोदा पुलापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूस शक्य त्याठिकाणी मोठे कृत्रिम जलकुंड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरात विविध 100 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत.
नागरिकांनी प्रदूषण होऊ नये, याची दक्षता घेत विसर्जन करावे, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बैठकीनंतर सांगितले. कृत्रिम जलकुंडाचा सार्वजनिक मंडळे व नागरिकांनी वापर करावा. त्याचबरोबर आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे, असे आवाहनही पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले. महापालिकेकडून कृत्रिम जलकुंड तयार करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. येईल, असे प्रशासक देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यानंतर तातडीने जुना सांगली निरामय रिंग रोडवर कृत्रिम जलकुंड उभारण्याचे काम सुरू झाले आहे.