Kolhapur: सोशल मीडियातील अफवांना बळी पडू नका; जिल्हाधिकारी, पोलिसांकडून कोल्हापूरवासियांना आवाहन
प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनीही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे.
Kolhapur News: कोल्हापूर शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे लक्ष असून कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यात येत आहे. नागरिकांनी सोशल मीडियातून पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनीही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे.
आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन कोल्हापूर शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेची पाहणी राहुल रेखावार यांनी केली. या पाहणीनंतर ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच सर्वधर्मसमभावाचा आणि प्रगतशील जिल्हा राहिला आहे. शाहू महाराजांचे कार्य कर्तृत्व आणि त्यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेवून आजवर कोल्हापूर जिल्ह्याने जगाला पुरोगामी आणि आधुनिकतेचा विचार दिला आहे. जगाला आदर्श विचार देणारा हा संपूर्ण जिल्हा आहे. कोल्हापूरचा सामाजिक क्षेत्रातील ठसा कायम राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन करुन प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
अफवांना नागरिकांनी बळी पडू नये
दरम्यान, सोशल मिडियावरील अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. अनावश्यक घराबाहेर पडून गर्दीत भर घालू नये, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे. कोल्हापूर मधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. परिस्थितीचा फायदा घेवून लोकांना घाबरवणाऱ्या व दंगा घडवून आणणाऱ्या गुंडांना शोधण्यात येत असून त्यांना अटक करण्याची कारवाई सुरु राहणार आहे. झालेल्या नुकसानीची दखल घेवून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल. सध्या स्थानिक प्रशासनाकडून निर्गमित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी पालन करावे. पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना संरक्षण देण्यास पूर्णतः कटिबद्ध असून कोणतीही अडचण आल्यास स्थानिक पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन अथवा पोलीस प्रशासनाशी नागरिकांनी संपर्क करावा, असे आवाहन फुलारी यांनी केले आहे.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये सोशल मीडियामधून कुठल्या प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल होऊ नयेत यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून आता मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून दूरसंचार कंपन्यांना आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी यांनी दिली आहे. कोल्हापुरातील संवेदनशील भागात 31 तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या