Kolhapur Crime : कर्नाटकात बनावट नोटा छापून राज्यात खपवण्याचा कट उधळला, दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त
Kolhapur Crime : कर्नाटकात बनावट नोटा तयार करून राज्यात खपवण्याचा डाव कोल्हापूर पोलिसांनी उधळला आहे. बनावट चलनी नोटा खपविण्यासाठी आलेल्या तिघांना सापळा रचून बेड्या ठोकण्यात आल्या.
Kolhapur Crime : कर्नाटकात बनावट नोटा तयार करून राज्यात खपवण्याचा डाव कोल्हापूर पोलिसांनी उधळला आहे. बनावट चलनी नोटा खपविण्यासाठी आलेल्या तिघांना सापळा रचून बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्याकडून दोन लाखांच्या पाचशे, दोनशे व शंभर रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
गडहिंग्लज तालुक्यातील महागावमध्ये ही कारवाई करण्यात आली. अब्दुलरजाक आब्बासाहेब मकानदार (वय 25, एकसंबा रोड, मेहबूबनगर, चिक्कोडी, जि. बेळगाव), अनिकेत शंकर हुले (20, रा. महागाव), संजय आनंदा वडर (35, सध्या रा. शिक्षक कॉलनी नेसरी, ता. गडहिंग्लज,) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांना महागावातील पाच रस्ता चौकात दोघे बनावट नोटा खपविण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्या नेतृत्वात सहा पोलिसांचे पथक कारवाईसाठी रवाना झाले. पोलिसांनी संशयित येणाऱ्या दोन गट करून सापळा रचला.
यावेळी एक व्यक्ती बाईकवरून गडहिंग्लजकडून आल्यानंतर चौकात वाट पाहत थांबलेल्या दोघांच्या दिशेने गेल्यानंतर संशयावरून पोलिस पथकाने त्यांना पकडले. पोलिस पथकाने त्यांची झडती घेतली असता संशयित मकानदारकडे पाचशेच्या 65 हजार 500 रुपये किमतीच्या, अनिकेत हुलेकडे दोनशेच्या 67 हजार रुपये किमतीच्या, तर संजय वडरकडे शंभरच्या 56 हजार 100 रुपये किमतीच्या नोटा आढळून आल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून मोटारसायकलही जप्त केली.
पोलिसांनी संशयित मकानदारच्या चिक्कोडीतील घराची झडती घेतली असता नोटा तयार करण्यासाठी वापरलेले प्रिंटर, शाई आढळून आली. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटा चिक्कोडीमधील आहेत. त्यामुळे कर्नाटकात नोटांची छपाई करून महाराष्ट्रात खपविण्याचा कट पोलिसांच्या कारवाईमुळे फसला आहे.
ही कारवाई वडणे, हवालदार बाजीराव कांबळे, राजकुमार पाटील, पोलिस नाईक नामदेव कोळी, दादू खोत, कॉन्स्टेबल दीपक किल्लेदार, गणेश मोरे यांनी कारवाई केली.
इतर महत्वाच्या बातम्या