(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime : नटून थटून आल्या आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्या! 10 टक्के कमिशनच्या लोभाने करेक्ट कार्यक्रम!
Kolhapur Crime : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी ऑफिसमध्ये नटून थटून आल्या आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याचा प्रकार कोल्हापूरच्या आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयात घडला.
Kolhapur Crime : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी ऑफिसमध्ये नटून थटून आल्या आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याचा प्रकार कोल्हापूरच्या आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयात घडला. ऑफिसमध्ये एकीकडे अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम सुरू असतानाच आरोग्य उपसंचालक मात्र लाच घेण्यात व्यग्र होत्या.
एका बाजूला अमृतमहोत्सवी कार्यक्रम सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी हे काम मंजूर करण्यासाठी तक्रारदाराला कार्यालयात बोलवून घेतले होते. यावेळी 5 हजार रुपयांची लाच घेताना त्या लाचलुचपत विभागाच्या ताब्यात अलगद सापडल्या. ऑफिसमधील कार्यक्रमासाठी नटून थटून आल्या, पण कारवाई झाल्यानंतर भावना चौधरी यांच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली.
या लाचखोर अधिकाऱ्याचा पर्दाफाश लाचलुचपत विभागाने करत रंगेहाथ ताब्यात घेतले. आरोग्य उपसंचालक असलेल्या भावना चौधरी यांनी भविष्य निर्वाह निधीतील रक्कमेपैकी 90 टक्के रक्कमेतील 6 लाख 72 हजार रुपये मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 10 टक्के म्हणजेच 6 हजार 700 रुपयांची लाच तक्रारदार यांचेकडे मागणी करून तडजोडीअंती 5 हजार रुपये लाच रक्कम मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर कार्यालयाकडे भावना सुरेश चौधरी, मुख्य प्रशासकिय अधिकारी उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ कोल्हापूर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता भावना चौधरी यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे कार्यालयात सापळा लावला असता भावना चौधरी तक्रारदाराकडून 5 हजारांची लाच घेताना अलगद सापडल्या. तक्रारदार हे पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार असल्याने रक्कम मंजुरीसाठी प्रक्रिया सुरु केली होती. भावना गवळी यांच्या अखत्यारित कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा कार्यभार आहे.
सदरची कारवाई राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक, अॅन्टी करपान ब्युरो, पुणे, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, पो.हे.कॉ शरद पोरे, पोकाॅ मयूर देसाई, रूपेश माने, संदिप पडवळ व महिला पोकाॅ छापा पाटोळे, अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली.