Chandrashekhar Bawankule on Suresh Halvankar : भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांनी निष्ठेला हाच का न्याय? विचारताच चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
आमदार प्रकाश आवाडे आणि सुरेश हाळवणकर यांच्यामध्ये मनोमिलन झालं नसल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दौऱ्यामध्ये कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले होते.
कोल्हापूर : अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांची नाराजी कायम आहे. आज (17 ऑक्टोबर) इचलकरंजीमध्ये भाजपचा मेळावा होत असतानाच पक्षामधील खदखद समोर आल. आमदार प्रकाश आवाडे आणि सुरेश हाळवणकर यांच्यामध्ये मनोमिलन झालं नसल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दौऱ्यामध्ये कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, सुरेश हाळवणकर यांच्यासाठी केंद्रीय नेत्यांना विनंती करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
मेळावा पार पडल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, इतके दिवस विरोधात असल्याने सामावून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण हाळवणकर यांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने मला अभिमान असल्याचं ते म्हणाले. त्यांना योग्य न्याय दिला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपचा उमेदवार बहुमताने निवडून येईल असेही ते म्हणाले. निष्ठावंत कार्यकर्ते, नेत्यांना माझा सलाम असल्याचे ते म्हणाले. दरम्यान भाजपच्या काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. केंद्रीय निवडणूक समितीसमोर प्रेझेंटेशन करण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक समिती यादी जाहीर करणार असून तेच योग्य माहिती देतील असे ते म्हणाले.
शरद पवार आधी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणार होते
त्यांनी सांगितले की, कोणाचाही पत्ता कट होणार नाही उर्वरित जागांवर पुन्हा बैठक होणार आहे. आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत असे ते म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केल्यानंतर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शरद पवार आधी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणार होते, त्यानंतर सुप्रिया सुळे यांना करणार होते. आता ते जयंत पाटील यांचे नाव घेत आहेत. मुख्यमंत्री पदावरून बोलताना त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांची वाईट स्थिती झाली आहे. दिल्लीला कटोरा घेऊन गेले होते, पण त्यांना परत पाठवण्यात आलं याचं वाईट वाटतं. त्यांना दिलीत जाऊन राहुल गांधी आणि सर्वांना भेटावं लागतं. त्यांच्यावर वेळ का आली याचा आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे, अशी टीका त्यांनी केली. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा आहे, आमच्याकडे विकास कामासाठी मुख्यमंत्री हवा आहे त्यांना त्यांची जागा दाखवणार असल्याचे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या