Satej Patil on Hasan Mushrif Raid : भाजपकडून मविआ आमदारांच्या मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न, मुश्रीफांवरील ईडी कारवाई पूर्वनियोजित; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Satej Patil on Hasan Mushrif Raid : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी तसेच कारखान्यावर ईडीने आज धाड टाकली. या कारवाईचा आमदार सतेज पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
Satej Patil on Hasan Mushrif Raid : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी तसेच कारखान्यावर ईडीने आज धाड टाकली. या कारवाईचा आमदार सतेज पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. भाजपकडून मविआ आमदारांच्या मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न असून मुश्रीफांवरील ईडी कारवाई पूर्वनियोजित असल्याचा हल्लाबोल सतेत पाटील यांनी केला.
सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. केवळ सूडबुद्धीने केलेली ही कारवाई निश्चित निषेधार्ह आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून अशा खेळी करून केला जात आहे. मुश्रीफ यांच्यावर झालेली ईडीची कारवाई झाली हा सर्व प्रकार पूर्व नियोजित होता हे स्पष्ट आहे. ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने कसा वापर केला जातो, याचे आजची ही कारवाई म्हणजे एक उदाहरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
हसन मुश्रीफांनी आरोप फेटाळले
दरम्यान, किरीट सोमय्यांनी केलेल्या सर्व आरोपांची उत्तरे दिली असून नव्याने तेच आरोप केले आहेत, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. मुश्रीफ पुढे म्हणाले, सोमय्या यांच्यावर दीड कोटींचा फौजदारी दावे केला आहे तो प्रलंबित आहे. आयकर विभागाचे छापे या आधी पडले होते. माझ्या कुटुंबावर छापे टाकले. ईडीची नोटीस, समन्स काहीच नाही. कारखान्याचे पैसे शेअर्स माध्यमातून उभा राहिले. पुण्यातील गायकवाड यांच्याशी व्यावसायिक भागीदारी नाही. ब्रिक्स कंपनी माझी असा दावा केला जातो, पण त्यात तथ्य नाही. काळा पैसा कारखाना आणि शेल कंपनी माध्यमातून गुंतवलं असं सांगितलं जातं, पण त्या आरोपांमध्ये तथ्य नाही.
यंत्रणांचा वापर करून त्यांना बदनाम किंवा नामोहरम करण्याचा प्रयत्न
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, यापूर्वीही मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आयकर विभागाची धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी काही निष्पन्न झाले नाही. आताही ईडीकडून धाड टाकण्यात आली. मात्र, विरोधी पक्षातील जे लोक सातत्याने ठामपणे सरकारविरोधात उभे राहतात, त्यांच्या विरोधात विविध यंत्रणांचा वापर करून त्यांना बदनाम किंवा नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे.
सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचं
हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईवर बोलताना अजित पवार म्हणाले की, सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचं आहे. ठाकरे गटातील राजन साळवी, नितीन देशमुख, वैभव नाईक यांच्यावर राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या तपास यंत्रणाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे याला राजकीय रंग आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाहक त्रास कोणाला होता कामा नये. अनिल देशमुखांवर कारवाई झाली, पण कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. संजय राऊत यांच्यासोबत देखील असेच झाले. हे सर्व प्रकार देशाला आणि राज्याला परवडणारे नाही.
इतर महत्वाच्या बातम्या