Kolhapur News: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर कोल्हापुरातून 14 जणांची नियुक्ती; कोणाकोणाला मिळाली संधी?
BJP Kolhapur: भाजपने 45 पदाधिकारी, 264 विशेष निमंत्रित आणि 512 निमंत्रित सदस्यांची प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून 14 जणांना संधी मिळाली आहे.
BJP Kolhapur: भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणीवर जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने 45 पदाधिकारी, 264 विशेष निमंत्रित आणि 512 निमंत्रित सदस्यांची घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून 14 जणांना संधी मिळाली आहे. यामध्ये माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. महेश जाधव यांची सचिवपदी बढती करण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारिणीमध्ये ओबीसी सेलचे संदीप कुंभार, सचिन तोडकर, डॉ. अजय चौगुले आणि डॉ. संतोष चौधरी यांचा समावेश आहे. निमंत्रित सदस्यांमध्ये माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, ज्येष्ठ नेते बाबा देसाई, संग्राम कुपेकर यांचा समावेश आहे. कुपेकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
निमंत्रित सदस्यांमध्ये माजी आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संदीप देसाई, शिरोळचे पृथ्वीराज यादव, डॉ. अरविंद माने, विजयेंद्र माने यांचा समावेश आहे. निवडींमधून कोल्हापूर भाजपमधील सर्वच नेत्यांच्या गटांना संधी देण्यात आली आहे. सचिन तोडकर यांचीही प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे. महेश जाधव यांना बढती आणि विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांची निमंत्रित सदस्यमध्ये नियुक्ती झाल्याने या दोन्ही जागांवर आता नवे चेहरे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये महाडिक आणि चंद्रकांत पाटील गटाकडून नावे सुचवून दावा केला जाऊ शकतो. सध्या दोन्ही गटात पदाधिकारी नियुक्त्यांवरून शीतयुद्ध सुरु आहे.
बाजार समिती निवडणुकीत भाजप नेत्यांना कानपिचक्या!
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये सभासदांनी नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भाजपकडे लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये दोन कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या चांगल्याच लक्षवेधी ठरल्या होत्या. या चिठ्ठ्यांमधून पक्षाकडे लक्ष देण्यासह निष्ठावंतांना न्याय देण्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
एका कार्यकर्त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काय?
चंद्रकांतदादा मार्केट कमिटीला भाजपचा उमेदवार कुठे आहे, नाव भाजपचं आणि काम गटाचं. महाडिक गट, घाटगे गट, देसाई गट, आवाडे गट असे सगळे गटच. भाजप संघटना जिल्ह्यातून जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. हे गट सत्ता आहे म्हणून आहे सत्ता गेली हे गेली मग हुडकता (शोधणे अशा अर्थाने) जुने कार्यकर्ते. स्वतःचा कार्यकर्ता मोठा करावा लागतो, तर नंतर नेता, पक्ष मोठा होतो. तुम्ही पीएना मोठे केलं, जमत असेल तर बदल करा नाही, तर चालू दे आम्हाला काही फरक पडतो.
दादा थोडं निष्ठावंतांकडे मागे वळून पहा कारण की निष्ठावंताची चेष्टा व गद्दारांची प्रतिष्ठा हे कुठेतरी थांबलं पाहिजे. दादा तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत तरी त्या अपेक्षांचा भंग होऊ देऊ नका. आपलाच निष्ठावंत कार्यकर्ता.. मरेपर्यंत...अशी भावनाही एका कार्यकर्त्याने पत्रातून व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या