(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात सहा बंधारे पाण्याखाली; पावसाने उघडीप दिल्याने दिलासा, अलमट्टीतून मोठा विसर्ग
Kolhapur Rain : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वदूरर गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत सात फुटांनी वाढ झाली. जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
Kolhapur Rain : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वदूरर गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत सात फुटांनी वाढ झाली. जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे स्थानिक वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने राजाराम बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला. तथापि, गेल्या 24 तासांपासून पावसाने उघडीप दिल्याने बंधाऱ्यावरील पाणी ओसरण्यास मदत झाली.
जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली
तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीवरील रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ बंधारा पाण्याखाली आहे. दुधगंगा नदीवरील दत्तवाड आणि वारणा नदीवरील तांदुळवाडी पाण्याखाली गेला आहे.
राधानगरी धरणातून 500 क्युसेकने भोगावती नदीत विसर्ग
दरम्यान, जिल्ह्यातील राधानगरी धरणात 231.89 दलघमी पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणातून 500 क्युसेकने भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी आजही यलो अलर्ट
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला यलो अलर्ट आजपर्यंत आहे. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने आजही पावसाची शक्यता नाकारता येत नाही. घाटमाथ्यांवर 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात 78 गावांमध्ये पिकांची नासाडी
कोल्हापूर जिल्ह्यात सलग तीन दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. तब्बल 78 गावांमधील 989 हेक्टरमधील भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी भुईमूग आणि सोयाबीनला कोंब येण्याची भीती आहे. दुसरीकडे पोसलेलं भात पीक झोपल्यानंही अनेक बळीराजांचा तोंडचा घास हिरावला गेला आहे.
अलमट्टी धरणातून मोठा विसर्ग
गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने अलमट्टी धरणातून मोठा विसर्ग केला जात आहे. धरणातून सध्या कृष्णा नदीपात्रात 1 लाख 17 हजार 951क्युसेकने विसर्ग सुरु आहे. अलमट्टी धरणात सध्या 104.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोयना धरणातून विसर्ग बंद
पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणातून विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणात सध्या 104.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात 3 हजार 357 क्युसेकने आवक सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Karnataka Bhavan : सीमाभागात मराठी भाषिकांची गळचेपी होत असताना महाराष्ट्रात 'कर्नाटक' नाव कशासाठी? कणेरी मठातील कर्नाटक भवनला शिवसेनेचा विरोध