Jalna : जालन्यातील लाठीचार्जनंतर एसपी सक्तीच्या रजेवर, शैलेश बलकवडे नवे पोलिस अधीक्षक, तातडीने पदभार स्वीकारला
Jalna Maratha Andolan : जालन्यातील घटनेनंतर तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांच्या जागेवर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जालना: मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्याच्या गृहमंत्रालयाने तातडीने पावलं उचलायला सुरूवात केली असून शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शैलेश बलकवडे यांनीही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या जागेवर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांनी या आधी गोंदिया, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्य सरकारने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि शैलेश बलकवडे यांची जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. शैलेश बलकवडे यांनीही तातडीने पदभार स्वीकारला आहे. जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा आढावा आता नवीन एसपी शैलेश बलकवडे घेत असल्याची माहिती आहे.
जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्यांमुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत होते. तर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठी मार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान या सर्व प्रकरणाची आता गृह विभागाने गंभीर दखल घेतली असून, जालना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर पहिली कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे जालना प्रकरणात ही पाहिली कारवाई समजली जात आहे.
जालन्यात घडलेल्या लाठीचार्जनंतर त्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून विविध संघटनांनी बंद पुकारला आहे. तसेच पोलिसानी केलेल्या या लाठीचार्जचा विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान, जालन्यात लाठीचार्जच्या निषेधार्थ एसटीच्या बसेसची जाळपोळ केल्याप्रकरणी 52 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी 19 एसटी बसेसचे नुकसान झाल्याची माहिती आहे. राज्य परिवहन मंडळाच्या वाहतूक नियंत्रकाच्या फिर्यादीवरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि प्रवाशांच्या जिवितास धोका उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही बातमी वाचा: