जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर; सरकारकडून कारवाईला सुरुवात
जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
Maharashtra Jalna News: जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर आता सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे एसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्यांमुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत होते. तर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठी मार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान या सर्व प्रकरणाची आता गृह विभागाने गंभीर दखल घेतली असून, जालना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर पहिली कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे जालना प्रकरणात ही पाहिली कारवाई समजली जात आहे.
जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद
जालन्यात घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहे. तसेच, विरोधकांनीही सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. अशातच आता सरकार काहीसं अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर थेट गृहविभागानंच कारवाई करत, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
जालन्यातील 200 ते 250 आंदोलकांवर गुन्हे दाखल
मराठा आरक्षणासाठी आंदोलन (Maratha Reservation Agitation) करणाऱ्या जालन्यातील 200 ते 250 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जालना शहरातील अंबड चौफुली आणि इंदेवाडी भागामध्ये पोलीस (Police) आणि आंदोलकांमध्ये झालेल्या वादांचे रुपांतर दगडफेकीमध्ये झाले होते. यानंतर पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत. अंबड चौफुली भागात एक ट्रक जाळून चालक असलेला फिर्यादी आणि क्लिनरला डांबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.