Manoj Jarange Patil : धनंजय देशमुखांना धमकी दिल्याचा आरोप, मनोज जरांगे संतापले, धनुभाऊंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...
Manoj Jarange Patil : माझ्यावर हजारो केसेस केल्या तरी मी न्याय करणार, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.

Manoj Jarange on Dhananjay Munde : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढले जात आहेत. परभणी येथील मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आता मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केलाय.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय देशमुख यांना तुम्ही धमक्या देत आहेत. गुंडाला बोललो तर तुम्ही मला जातिवाद म्हणत आहेत. मी समाज म्हणून आलोय. गरीबाच्या लेकराला न्याय देण्यासाठी मी बोलतोय, समाज बोलतोय. मंत्राला नाही बोलायचं तर मग कोणाला बोलायचं? आम्ही आमच्या समाजाच्या नेत्याला बोलत नाहीत का? धनंजय मुंडेचं त्यांना वाचवण्यासाठी षडयंत्र आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे चुकीचा पायंडा पाडतोय
त्यांनी ओबीसीचं पांघरून घेऊ नये, स्वतः पाप करायचं, त्यांचा समाज अजिबात यात नाही. आरोपीच्या बाजूने बोलतात, आरोपींना साथ देतात, मंत्र्यांना बोलू नका, तुमचा काय संबंध आहे? गावात फिरू देणार नाही, रस्त्यावर फिरू देणार नाही हे मंत्र्यांनाच बोलावं लागतं. आमच्या समाजाच्या मंत्र्याला बोलल्यावर आम्ही पण तसेच करायचं का? धनंजय देशमुख न्यायासाठी वणवण फिरत आहे. त्याला पोलीस स्टेशनला जाऊन धमक्या देत आहे. त्या गुंडाला बोलायचं नाही का? तुमचा नेता नाही तो सरकार मधला आहे. यात जातीचा काय संबंध? ओबीसीचा काय संबंध? मी वंजारी, धनगर, दलित, ओबीसीचं नाव घेतलं का? लोक कापायचे आहेत का तुम्हाला? धनंजय देशमुख यांना धमकी दिली, तेव्हा मी धन्या मुंडेचे नाव घेतले. तू माझ्या नादी लागू नको. माझ्यावर हजारो केसेस केल्या तरी मी न्याय करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तर धनंजय मुंडे चुकीचा पायंडा पाडतोय, असेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा























