मुन्नाभाई डीवायएसपी! एलएलबी परीक्षेत स्वतःच्या नावाने बसवला डमी उमेदवार, अखेर गुन्हा दाखल
jalna: कदीम-जालना पोलीस ठाण्यात डीवायएसपी खिरडकर आणि एका पोलीस शिपाया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jalna Crime News: जालना येथील तत्कालीन डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्याविरुद्ध परीक्षेत डमी उमेदवार बसवल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2020 साली झालेल्या एलएलबी परीक्षेत सुधीर खिरडकर यांनी डमी उमेदवार म्हणून पोलीस शिपायास बसवल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारी वरून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या चौकशी समितीने तात्कालिक डीवायएसपी आणि डमी उमेदवार पोलीस शिपायास दोषी ठरवलं होतं. दरम्यान विद्यापीठाचे परीक्षा विभाग प्रमुख गणेश मांझा यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून कदीम-जालना पोलीस ठाण्यात डीवायएसपी खिरडकर आणि एका पोलीस शिपाया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांने घेतलेल्या विधी अर्थात एलएलबी परीक्षा ऑक्टोबर आणि नोव्हेंम्बर 2019 मध्ये पार पडली होती. यावेळी जालना येथे कर्तव्यावर असताना तत्कालीन डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी जालना शहरातील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात लॉ च्या प्रथम वर्षाची परीक्षा दिली होती. मात्र या परीक्षेला त्यांनी स्वतः न बसता आपल्या अधिकारांचा गैरवापर करत चक्क डमी उमेदवाराला परीक्षेला बसवलं होते. विशेष म्हणजे डमी उमेदवार म्हणून त्यांनी आपल्याच एका पोलीस कॉन्स्टेबलची निवड केली होती.
असा झाला भांडाफोड...
दरम्यान या परीक्षेत डमी उमेदवार बसल्याची कुणकुण पोलीस विभागात सुरू झाली होती. कार्यालयीन राजकारणातली ही कुणकुण काही जाणत्या लोकांच्या कानावर आली आणि त्याच तक्रारींमध्ये रूपांतर झालं. रीमा खरात-काळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ विलास खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली. या समितीने 9 मे 2022 रोजी आपला चौकशी अहवाल विद्यापीठास सादर केला. ज्यात त्यांनी तत्कालीन डीवायएसपी तथा सध्या लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात उपप्राचार्य असलेल्या सुधीर खिरडकर आणि डमी उमेदवार सोमनाथ मंडलिक यांना दोषी ठरवल.
चौकशी अहवालात काय?
सदर प्रकरणात चौकशी समीतीने चौकशी केली असता, चौकशीअंती सुधीर खिरडकर यांनी दिनांक 4 फेब्रुवारी 2020 ते दिनांक 8 फेब्रुवारी 2020 दरम्यान विधी शाखेच्या पदवीचे एकून 05 पेपर दिलेले आहेत. या सर्व उत्तरपत्रीकांवरील परीक्षार्थीची स्वाक्षरी, पेपरनिहाय उपस्थिती पत्रकावरील परीक्षार्थीची मुळ स्कॅन केलेली स्वाक्षरी आणि परीक्षार्थीने प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये परीक्षार्थीने उत्तरपत्रीकेवर आणि पेपरनिहाय उपस्थीतीपत्राकावर केलेल्या स्वाक्षरी पेक्षा भिन्न आहे. यावरुन स्पष्ट होते की, सुधीर अशोक खिरडकर यांचे सर्व पेपर डमी विदयार्थ्याने दिलेले आहेत.
तर 20 ऑक्टोबर 2021 रोजी सुधीर अशोक खिरडकर यांनी चौकशी समिती समोर लिहून दिलेल्या दोन परिच्छेदातील हस्ताक्षर हे 4 फेब्रुवारी 2020 व दिनांक 5 फेब्रुवारी 2020 च्या मुळ उत्तरपत्रीकेतील हस्ताक्षराशी जुळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर पोलीस हवालदार सोमनाथ सहदेव मंडलीक यांनी चौकशी समिती समोर लिहून दिलेल्या दोन परिच्छेदातील हस्ताक्षर हे 4 फेब्रुवारी 2020 व दिनांक 5 फेब्रुवारी 2020 च्या मुळ उत्तरपत्रीकेतील हस्ताक्षराशी मिळते जुळते दिसुन आल्याने, सुधीर अशोक खिरडकर यांचे पेपर सोमनाथ सहदेव मंडलीक यांनी दिल्याचे स्पष्ट होत असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.