Jalna News: मुलानं स्वतःच्याच मित्राचा खून केल्याचं कळताच वडिलांनी सोडला जीव; जालन्यातील धक्कादायक घटना
Jalna Crime News: मुलाने खून केल्याची माहिती मिळताच, अकबर शेख यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे.
Jalna Crime News: जालन्यातील (Jalna) बदनापूर तालुक्यातील देवगाव फाट्याजवळ आढळून आलेल्या मृतदेहाप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध लावला असून, मित्रानेच आपल्या मित्राचा खून (Murder) केल्याचे समोर आले. शेख फय्याज शेख रईस (वय 25, रा. शेरसवारनगर) असे मृत तरुणाचं नाव असून, तय्यब अकबर शेख (वय 23 वर्षे, रा. शेरसवारनगर) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे, तय्यब अकबर शेख यानेच खून केल्याची माहिती मिळताच त्याचे वडील अकबर शेख यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.
बदनापूर तालुक्यातील देवगाव फाट्याजवळ शेख फय्याज या तरुणाचा चाकूने छातीवर वार करून खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होते. तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी पथक तयार करून तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाचा अभ्यास करून मृत या ठिकाणी कसा आला असेल, मृताचे कोणासोबत वाद आहेत काय, त्याचे नातेवाइक आणि मित्रांनी शेवटी कधी पाहिले होते, अशा विविध अंगांनी गुन्ह्याचे विश्लेषण करून तंत्रशुध्द पद्धतीने तपास सुरू केला. तपास सुरू असताना बिगारी काम करणारा तय्यब अकबर शेख याने मित्र शेख फय्याज याचा खून केल्याची माहिती पोलीस निरिक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली होती.
पोलिसांनी सापळा लावून आरोपीला पकडले...
संशयित आरोपी तय्यब पळून जाण्याच्या प्रयत्नात असून, सध्या रेल्वेस्थानक परिसरात उभा असल्याची माहिती पोलीस निरिक्षक सुभाष भुजंग यांना खबऱ्यामार्फत समजले. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वेस्थानक परिसरात सापळा लावून संशयित तय्यब शेख यास दुपारी चारच्या सुमारास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शेख फय्याज याचा खून केल्याची कबुली दिली. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले, तरी दोघेही दारू पिण्याच्या सवयची असल्याने किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत तय्यब शेख याने हा खून केला, असावा अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आरोपी तय्यब वडिलांचा मृत्यू
या घटनेत संशयीत आरोपी तय्यब अकबर शेख याने हा खून केल्याची कबुली दिल्यानंतर त्याचे वडिल अकबर शेख यांना धक्का बसला. सोमवारी ते रात्री रेल्वेतून चेन्नईकडे जात होते. त्यांना ही माहिती कळाल्यांनतर त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचा कयास पोलिसांनी वर्तविला आहे. तर वडिलांच्या निधनाने शेख परिवारावर दुहेरी संकट कोसळल्याने परिवारातील सदस्य हवालदिल झाले आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :
Jalna News: मराठवाडा हादरलं! औरंगाबादनंतर जालन्यातही गर्भपात; महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया