NIA-ATS विरोधात निदर्शने करणाऱ्या पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांवर जालना,बीडमध्ये गुन्हे दाखल
Aurangabad : जालना येथे सौम्य लाठीमार सुद्धा करण्यात आला आहे.
NIA-ATS Raids: एटीएस आणि एनआयएकडून मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. राज्यभरात 20 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यात औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. मात्र या कारवाईनंतर जालना आणि बीड जिल्ह्यात पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांकडून शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. त्यामुळे पोलिसांकडून निदर्शने करणाऱ्या पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तर जालना येथे सौम्य लाठीमार सुद्धा करण्यात आला आहे.
जालन्यात पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल...
एटीएस आणि एनआयएकडून करण्यात आलेल्या कारवाईत जालना येथील रेहमागंज भागात राहणारा अब्दुल हादी अब्दुल मोमीन याला जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी पथकाने अब्दुल हादीला सोबत आणत त्याच्या घराची झडती घेतली. यावेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करत अब्दुल हादी निर्दोष असल्याचे सांगत घोषणाबाजी केली. सोबतच शहरातील मामा चौकात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने सुद्धा केली. त्यामुळे जालना पोलिसांनी 30 ते 40 पीएफआयच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.
बीडमध्ये सुद्धा निदर्शने करणाऱ्यांवर गुन्हे दाखल...
पीएफआयच्या विरोधात देशभरात कारवाई होत असतानाच मराठवाडा आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या विरोधात पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी बीड शहरातील बशीर गंज या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भागात निदर्शने केली. विशेष म्हणजे जमावबंदीचा आदेश डावलून ही निदर्शने करण्यात आली. त्यामुळे बीड पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये एकूण 39 जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाला अटक...
एटीएसने राज्यभरात पीएफआयच्या 20 जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. दरम्यान औरंगाबादच्या बायजीपुरा भागातील पीएफआयचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख नासेर शेख साबेर उर्फ नदवी ( वय 37, रा. बायजीपुरा, औरंगाबाद) याला सुद्धा एटीएसने शुक्रवारी अटक केली आहे. त्याला एटीएस विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 9 दिवसांची एटीएस कोठडी सुनावली आहे. नासेर याच्यावर देशविरोधी कट रचल्याचा आरोप आहे. सोबतच पीएफआयला 'टेरर फंडिंग' मिळाले आहे का? याचा तपास करण्यासाठी एटीएसने न्यायालयात कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने नासेरला 2 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या...
ED : PFI ने रचला होता PM मोदींवर हल्ला करण्याचा कट? ईडीचा खळबळजनक दावा, लक्ष्य होते 'पाटणा रॅली'