(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalna News : 'समृद्धी' साखर कारखान्याची मोठी घोषणा, शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला एक क्विंटल साखर फुकट
समृद्धी साखर कारखान्यानं (Samruddhi Sakhar Karkhana) एक मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला साखर कारखान्याकडून एक क्विंटल साखर फुकट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jalna News : जालना (Jalna) जिल्ह्यातील घनसावंगी येथील 'समृद्धी' साखर कारखान्यानं (Samruddhi Sakhar Karkhana) एक मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला साखर कारखान्याकडून एक क्विंटल साखर फुकट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व सभासद शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नासाठी आता 100 किलो साखर घरपोच मिळणार असल्यानं शेतकरी आनंदी आहेत. या निर्णयामुळं लग्नाचा गोडवा अधिकच वाढणार आहे.
कारखाना सुद्धा शेतकऱ्यांचे काही देणं लागतो, याच भावनेतून मदत
समृद्धी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर कारखान्याचे संचालक सतीश घाटगे यांनी येणाऱ्या हंगामापासून शेतकऱ्यांना आपले कर्तव्य म्हणून ही मदत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नात मोफत 100 किलो साखर मिळणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे. समासद शेतकरी हे आमच्या कारखान्याकडे ऊस गाळपासाठी पाठवत असतात. त्याला कारखान्याबद्दल एक आत्मियता असते. आम्ही सुद्धा शेतकऱ्यांचे काही देणं लागतो, याच भावनेतून कारखान्यानं हा निर्णय घेतल्याची माहिती कारखान्याचे संचालक सतीश घाटगे यांनी दिली आहे. 100 किलो देण्यात येणारी साखर ही शेतकऱ्यांच्या घरी पोहोच करण्यात येणार आहे. तर बाकीच्या ऊस उत्पादक सभासदांना 50 किलो साखर घरपोच देण्याचा निर्णय कारखान्यानं घेतला असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले.
यावर्षी महाराष्ट्रात साखरेचं विक्रमी उत्पादन होणार
चांगल्या पावसामुळं तसेच पाण्याचा चांगला साठा उपलब्ध असल्यानं यंदा देखील राज्यात ऊस लागवडीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं यंदा देखील राज्यात साखरेचं विक्रमी उत्पादन (Sugar production) होण्याचा अंदाज आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु होणार आहे. यंदाच्या हंगामात 203 सहकारी आणि खासगी साखर कारखाने सुरु होणार आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळं 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड क्षेत्र सुमारे 14 लाख 87 हजार हेक्टरवर आहे. राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी 95 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे 203 कारखाने सुरू होणार असून यंदा 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्राने गेल्या हंगामात 137.36 लाख मेट्रीक टन साखर उत्पादन केलं असून, उत्तर प्रदेशला मागे टाकलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: