Jalna Update : जालन्यात सोमवारपासून 17 सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश; गोपालकाला, मुक्तीसंग्राम मिरवणूक काढण्यावर निर्बंध
Jalna Maratha Protest : जालन्यात जमावबंदीच्या काळात आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, रास्ता रोको करता येणार नाहीत. तसेच भाषणातून व्यक्तीच्या किंवा समूहाच्या भावना दुखावता येणार नाहीत.
![Jalna Update : जालन्यात सोमवारपासून 17 सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश; गोपालकाला, मुक्तीसंग्राम मिरवणूक काढण्यावर निर्बंध jalna police curfew from monday to 17 september gopalkala marathwada muktisangram restrictions amid protest Jalna Update : जालन्यात सोमवारपासून 17 सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश; गोपालकाला, मुक्तीसंग्राम मिरवणूक काढण्यावर निर्बंध](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/03/73b9a79d4e88b4c23d569badd10849061693737477628490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalna Incident : जालना जिल्ह्यात सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून 17 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी यासंबंधिचे आदेश दिले आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर या ठिकाणची परिस्थिती बिघडली असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे आदेश लागू केले आहेत.
जमावबंदीमुळे या गोष्टी करता येणार नाहीत
जमावबंदीच्या आदेशामुळे जालन्यात मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विविध संघटनाकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, रास्ता रोको आणि राजकीयदृष्ट्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेले आरोप प्रत्यारोप लक्षात घेता कलम (37)1 अन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या, बंदूक, तलवारी, भाले, चाकू आणि शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तू बाळगता येणार नाहीत. तसेच दगड एकत्रित गोळा करून ठेवता येणार नाही, जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ती किंवा त्याच्या प्रतिकात्मक शवाचे प्रदर्शन करता येणार नाही. भाषणातून व्यक्तीच्या किंवा समूहाच्या भावना दुखावता येणार नाहीत, गाणे किंवा वाद्याच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखवता येणार नाहीत. आवेशपूर्ण भाषण, अंगविक्षेप अराजक माजेल अशी चित्रे ,निशाणे, घोषणापत्रे वस्तू बाळगता येणार नाहीत.
जालन्यात लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशामुळे 6 तारखेची श्रीकृष्ण जयंती, 7 तारखेचा गोपाळकाला आणि 14 तारखेच्या पोळा तसेच 17 सप्टेंबरच्या दिवशी मुक्तीसंग्राम दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका आणि इतर कार्यक्रम रद्द करावे लागणार आहेत.
मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर अजूनही जालन्यात तणावपूर्ण परिस्थिती आहे. तर दुसरीकडे दगडफेक आणि लाठीचार्जमध्ये आंदोलक आणि पोलीस जखमी झाले. या घटनेचा राज्यभरातून निषेध केला जातोय. कुठे कडकडकीत बंद पाळण्यात आला तर कुठे आक्रमक होतो रास्तारोको करण्यात आला. काही ठिकाणी जाळपोळीच्याही घटना घडल्या आहेत.
जालन्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत असून त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यभरात तलाठी भरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यात उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला असला तरीही तलाठी भरतीची परीक्षा होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं असं आवाहन परीक्षा आयोजन करणाऱ्या संस्थेने केलं आहे. त्यासंबंधित एक मेल सर्व उमेदवारांना पाठवण्यात आला आहे. उद्या बंद जरी पुकारला असला तरी त्याचा फटका कोणत्याही परीक्षार्थीला किंवा नागरिकाला बसणार नाही अशी ग्वाही मराठा क्रांती मोर्चाच्या विनोद पाटील यांनी दिली आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)