सचिन तेंडुलकरच्या घरी काम करणाऱ्या एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
सचिन तेंडुलकरकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एसआरपीएफ जवानाने राहत्या घरी आत्महत्या केली आहे.
जळगाव: सचिन तेंडुलकरकडे (Sachin Tendulkar) सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एसआरपीएफ (SRPF) जवानाने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. प्रकाश कापडे असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. प्रकाश कापडे यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यात जामनेर येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती पसरताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली.
प्रकाश कापडे हे मुंबईत सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षा रक्षकाचे काम करत होते. पण आठ दिवसांपासून कापडे मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील घरी आले होते. गेली पंधरा वर्षा पासून ते एस आर पी एफ मध्ये कार्यरत होते. आज पहाटे त्यांनी ही आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही,त्याचा पोलिस तपास करत आहेत. राहत्या घरी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
गोळीबाराचा आवाज आल्यानंतर घरातील लोक धावत आले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. पंचनामा सुरू असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. तपास सुरू असून त्यानंतर कारण स्पष्ट होईल असे पोलीस म्हणाले. सचिन तेंडुलकरांच्या मुंबईतील बंगल्यात ते सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून घेतली. त्यावेळी घरातील सर्व जण झोपले होते.