Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
Raksha Khadse : रावेर लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत महत्वाचे भाष्य केले आहे.
Raksha Khadse जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी (Raver Lok Sabha Constitunecy) आज मतदान होत आहे. रावेरमधून महायुतीकडून रक्षा खडसे (Raksha Khadse) तर महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील (Shriram Patil) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज सकाळी रक्षा खडसे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्याबाबत महत्वाचे भाष्य केले.
रक्षा खडसे म्हणाल्या की, आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास आहे. रावेरचे मतदार एका सक्षम उमेदवाराला निवडून देतील. आज वाढदिवस असल्याने मतदारांकडून खास अपेक्षाही आहे. पती निखिल खडसे यांना जाऊन दहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यांची उणीव नेहमीच भासत राहणार आहे. गेल्या दहा वर्षात बरेच काही सहन केले आहे. मात्र आता त्याच्यातून सावरत समोर जात आहे.
नाथाभाऊंची मला साथ देण्यासाठीच भाजपमध्ये येताय - रक्षा खडसे
निखिल खडसे निघून गेल्यानंतर नाथाभाऊ यांची साथ फार महत्त्वाची आहे. ते मला साथ देण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये येत आहे. या वेळेला माझ्या निवडणुकीत जोरात काम करत आहे. प्रचार करत आहेत. भाजपच्या राज्यातील व केंद्रातील नेत्यांची साथ ही महत्त्वाची ठरली. त्यांनी कधीही माझ्याशी दुरावा केला नाही.
रोहिणी खडसे अन् माझा कौटुंबिक ऋणानुबंध कायम - रक्षा खडसे
मी आणि रोहिणी खडसे वेगवेगळ्या पक्षात असलो, तरी आमचा कौटुंबिक ऋणानुबंध नेहमीच कायम आहे. मताधिक्य किती राहील हे मतदारांच्या हाती असते मात्र विजय सुनिश्चित आहे, असा विश्वास यावेळी रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.
रक्षा खडसे - रोहिणी खडसे भेट
दरम्यान, रोहिणी खडसे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये मतदान महत्त्वाचे आहे. मी माझ्या मतदानाचा कर्तव्य पार पाडला आहे. मला विश्वास आहे, की महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने रावेरमध्ये विजयी होईल. कुटुंब वेगळी बाब आहे, राजकारण वेगळी बाब आहे. रक्षा खडसे भाजपमध्ये आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत आहे. मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराचे काम करत आहे. आज रक्षा खडसे मला भेटल्या. त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या माझ्या वहिणी ही आहे आणि या नात्यानेही त्यांना शुभेच्छा देण्यात काही गैर नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
आणखी वाचा