Raksha Khadse : एकनाथ खडसेंच्या सुनबाई आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये गिरीश महाजनांसमोर खडाजंगी, रक्षा खडसे स्पष्टच म्हणाल्या...
Raksha Khadse : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आणि कार्यकर्त्यांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच वाद झाल्याचा प्रकार घडला. यावर रक्षा खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jalgaon News जळगाव : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) रावेर लोकसभा मतदारसंघासाठी (Raver Lok Sabha Constituency) भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यांची उमेदवारी जाहीर होताच काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. तब्बल दोनशे कार्यकर्त्यांनी राजीनामेदेखील दिलेत. यांनतर आज रक्षा खडसे आणि कार्यकर्त्यांमध्ये मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या समोरच वाद झाल्याचा प्रकार घडला.
रक्षा खडसे भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांना डावलून राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांसोबत प्रचार करतात, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर खासदार रक्षा खडसे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.
कार्यकर्त्यांशी झालेला वाद किरकोळ
रक्षा खडसे (Raksha Khadse) म्हणाल्या की, आम्ही काम करताना आमच्याकडून चुका होत असतील, हे मी नाकारत नाही. मात्र मी कुठल्याही कार्यकर्त्यांना डावलले नाही. हा चुकीचा आरोप आहे. कार्यकर्त्यांशी झालेला वाद किरकोळ आहे. मी जर कार्यकर्त्यांना डावलले असते तर मला पक्षाने तिकीट का दिले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आता कोणीही नाराज नाही
त्या पुढे म्हणाल्या की, हा कोअर कमिटीचा व्हिडीओ बाहेर गेलाच कसा? या पद्धतीचा व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यामुळे पक्ष या व्हिडीओची दखल घेईल आणि ज्यांनी कोणी हा व्हिडीओ बाहेर आणला, त्याबाबत पक्ष चौकशी करेल, असे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक पक्षात कार्यकर्त्यांची नाराजी गिरीश महाजनांच्या (Girish Mahajan) माध्यमातून दूर करण्यात आली. आता कोणीही नाराज नाही, असा दावा रक्षा खडसे यांनी केला आहे.
आमच्या पक्षाचं पारडं जड
दरम्यान, आपली निवडणूक सोयीची व्हावी, यासाठी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उमेदवारी नाकारली असल्याचं आरोप राष्ट्रवादी नेते माजी मंत्री सतीश पाटील यांनी केला होता. याबाबत रक्षा खडसे म्हणाल्या की, हा आरोप फारसा बरोबर नाही. या आरोपात तथ्य नाही. शरद पवार यांच्यासारखा नेता आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी, अशी निवडणूक सोपी करणार नाही. त्यांना चांगला उमेदवार मिळत नाही हे सत्य आहे. ते चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहेत. समोर कितीही मोठा उमेदवार असला तरी आमच्या पक्षाने केलेले चांगले काम पाहता या निवडणुकीत आमचे पारडे जड असल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
रक्षा खडसे म्हणाल्या, वेळ आली तर एकनाथ खडसेंकडे मत मागणार, रोहिणी खडसेंनी दिलं सडेतोड उत्तर!