Maharashtra Cabinet Expansion : पंकजा मुंडे यांचं भाष्य, फडणवीसांचं मौन, खडसेंची भाजपवर टीका आणि महाजन यांचं प्रत्युत्तर
Maharashtra Cabinet Expansion : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मौन सोडत माझी पात्रता नसल्याने मंत्रिपद दिलं नसेल असं म्हटलं. यावर फडणवीसांचं मौन बाळगलं. तर खडसेंनी भाजपवर टीका केली. त्यांच्या टीकेला गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं.
Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अखेर पार पडला. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मौन सोडत माझी पात्रता नसल्याने मंत्रिपद दिलं नसेल असं म्हटलं. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली नाही. नागपुरात पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर टाळलं. तर पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपवर निशाणा साधला. मुंडे परिवार आणि त्यांच्याशी जवळच्या ओबीसींवर नेहमीच अन्याय केला जातो, अशी टीका खडसे यांनी केली. तर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. पंकजा मुंडे नाराज नाही, असं ते म्हणाले.
एकनाथ खडसे काय म्हणाले?
"मंत्रिमंडळ विस्तार अपूर्ण आहे. पुढच्या काळात अजून तो होईल, मात्र सध्याचा विचार केला तर पंकजा मुंडे असो की गोपीनाथ मुंडे परिवाराशी निगडित कोणी असो या सगळ्यांवर सातत्याने अन्याय झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळेल किंवा नाही याबाबत मला शंका वाटत आहे. मात्र त्यांनी मंत्रिपद मिळण्यासाठी जास्त वाट न पाहता आपल्या वरिष्ठांना भेटावे. मंत्रिपदासाठी आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत," असं एकनाथ खडसे म्हणाले.
ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही : गिरीश महाजन
पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला. मुंडे परिवार आणि त्यांच्याशी जवळच्या ओबीसींवर नेहमीच अन्याय केला जातो, अशी टीका खडसे यांनी केली. त्यावर रीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, "ओबीसींची कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. ओबीसींना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून त्यांच्यावर अन्याय झालेला नाही. पंकजा मुंडे यांची कुठल्याही प्रकारची नाराजी नसून असेल तर पक्षश्रेष्ठी त्यांची नाराजी दूर करतील."
देवेंद्र फडणवीस यांचं मौन
तर पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगणं योग्य समजलं. नागपूर तसंच वर्ध्यात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं त्यांनी टाळलं. वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी "यावर बोलण्याची ही जागा आहे का," असं म्हटलं.ं