उद्धव ठाकरे यांचं दुर्लक्ष आणि संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्यामुळेच शिवसेनेला आत्महत्या करावी लागली - गिरीश महाजन
Girish mahajan on ShivSena : उद्धव ठाकरे यांचं दुर्लक्ष आणि संजय राऊत यांची बेताल वक्तव्यामुळेच सेनेला आत्महत्या करावी लागली, असे वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले आहे.
Girish mahajan on Shiv Sena : उद्धव ठाकरे यांचं दुर्लक्ष आणि संजय राऊत यांची बेताल वक्तव्यामुळेच शिवसेनेला आत्महत्या करावी लागली, असे वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले आहे. ते एबीपी माझासोबत बोलत होते.
शिवसेनामध्ये फूट पडल्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना पक्षातील एकदोन मंत्री सोडले तर कोणाचीही भेट घेतली नाही. मुख्यमंत्री कोणालाच भेटत नसल्याने तसेच कामे होत नसल्याने शिवसेनेत नाराजी होती. त्यात संजय राऊत यांच्या वर सगळ सुरू होते ते कोणाला आवडत नव्हते. बाळासाहेब यांचा मूळ हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी सोडला आहे, दोन जागासाठी एम आय एम कडे त्यांना जावं लागले. ही सगळी नाराजी असताना एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आणि त्यातून ते जवळ वाटायला लागले. त्यानंतर जे घडले ते तुम्ही पाहिलेच, असे गिरीश महाजन म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी गिरीश महाजन यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले.
आमदारांनंतर आता खासदार बंडखोरी करणार?
संजय राऊत यांची वक्तव्य पाहता सेना आता रसातळाला गेली आहे. त्यामुळे या पुढे एक दोन लोक सोडली तर त्यांच्याकडे कुणी राहील असं वाटत नाही. पुढे भविष्य नसल्याने आमदार पाठोपाठ आता खासदार ही येण्याच्या मार्गावर आहेत, असे गिरीश महाजन म्हणाले.
शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामध्ये संजय राऊतांचा हात -
बाळासाहेब आणि उद्धव यांच्या दोन्हीच्या काळातील शिवसेना आपण जवळून पाहिली आहे. आताच्या सेनेचा विचार केला तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि एम आय एम यांच्या समोर लोटांगण घालणारी सेना आहे. संजय राऊत अतिशय बेताल वक्तव्य करत आहेत. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले. मंत्रीपदाबाबत आपल्या कोणीही लालसा नाही. पक्षाने जे मला दिले आहे, ते भरपूर दिले आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे, असेही महाजन म्हणाले.
मोदींमुळे शिवसेनेचे 18 खासदार निवडून आलेत -
संजय राऊत आज काहीही बोलत असले तरी लोकसभा आणि विधानसभेला त्यांनी मोदी यांचा फोटो लावला. त्यामुळे त्यांचे अठरा खासदार निवडून आले. आम्ही मदत केली म्हणून हे शक्य झाले. अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं ठरलं नसल्याने ते कोणत्याही सभेत बोलले नाहीत. आता खोट बोलत आहेत, असं ठरलेलं असतं तर संजय राऊत हे भोंगा घेऊन सगळी कडे फिरले असते, असा टोला महाजन यांनी लगावला.