Jalgaon News : 40 क्विंटल कापसाचं वजन 30 क्विंटल, मापात पाप करणाऱ्यांची आमदारांकडून पोलखोल
Jalgaon News : जळगावमध्ये व्यापाऱ्यांकडून कापूस मोजताना काटा मारला जात असून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत आहे.
Mangesh Chavhan : दोन पैसे जास्त मिळावे म्हणून अनेक शेतकरी (Farmers) आपला कापूस बाहेरच्या जिल्ह्यातील अनोळखी व्यापाऱ्यांना विकतात. मात्र याचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांचा कापूस मोजताना काटा मारला जात असून त्यात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होते. असाच फसवणुकीचा जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) यांनी उघडकीस आणला आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव (Chalisgaon) परिसरात ही घटना घडली आहे. येथील मुन्ना साहेबराव चव्हाण या शेतकऱ्याने आपला 40 क्विंटल कापूस वेचणीच्या वेळी मोजून घरात ठेवला होता. गावात आलेल्या धुळे जिल्ह्यातील (dhule) मूकटी येथील व्यापाऱ्याने तो कापूस (Cotton) 7800 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी केला. मात्र वजन केल्याच्यावेळी 40 क्विंटल कापसाचे केवळ 30 क्विंटलच वजन आले. सबंधित व्यापाऱ्याने मोजलेल्या मालाची रक्कम देखील शेतकऱ्याला तात्काळ दिली. मात्र शेतकऱ्याने तात्काळ सजगता दाखवून योग्यरीत्या काटा केला असता 40 क्विंटल कापूस भरल. तर व्यापाऱ्याने केला असता 30 क्विंटल भरला, यावरून थेट आमदारांनी घटनास्थळी गाठत व्यापाऱ्याची कानउघाडणी केली आहे.
दरम्यान क्विंटल मागे 30 ते 35 किलोचा काटा मारून शेतकऱ्यांचा माल धुळे जिल्ह्यातील मूकटी येथील व्यापाऱ्याकडून विकत घेतला जात होता. मात्र आपला 40 क्विंटल कापूस 30 क्विंटल आला, म्हणजे जवळपास 10 क्विंटल घट आल्याने शेतकऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गावातील सरपंच व इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब शेतकरी मुन्ना चव्हाण याने आणून दिली असता त्यांनी संबंधित व्यापाऱ्याला याचा जाब विचारला. तसेच झालेल्या प्रकाराची माहिती मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना दिली. त्यांनतर आमदार मंगेश चव्हाण यांनीदेखील तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तोपर्यंत संबंधित व्यापारी हा तिथून फरार झाला होता.
आमदार मंगेश चव्हाण यांनी 40 किलोच्या मागे 10 ते 12 किलो कापूस म्हणजे एका क्विंटलमागे 30 ते 35 किलो जास्त कापूस मोजला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आमदारांनी सदर शेतकऱ्यांसोबत तो मोजलेला कापूस, गाडी असा मुद्देमाल घेऊन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना सदर गंभीर घटनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची तक्रार दाखल करून घेण्याचे सांगितले.
सिंडीकेट उघडकीस आणणार - आमदार मंगेश चव्हाण
सदर प्रकार अतिशय गंभीर असून अस्मानी संकटांचा सामना करत असताना आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना काही भामटे व्यापारी अश्या पद्धतीने लुटत आहेत. हा केवळ एका व्यापाऱ्याचा किंवा एका शेतकऱ्याचा विषय नसून हे मोठे सिंडिकेट आहे, काटा मारलेला कापूस मोजण्यासाठी आदिवासी समाजातील गरीब मजुरांना कामावर घेतले जाते तसेच ज्या गाडीत कापूस भरला जातो ती गाडी देखील भंगार स्वरूपातील वापरली जाते. यात काही जिनिंग वाले देखील सहभागी आहेत. त्यामुळे या सर्व सिंडिकेट चा सविस्तर तपास करून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.
इलेक्ट्रॉनिक काटा वापरण्याचा आग्रह धरावा...
तसेच शेतकऱ्यांनी शक्यतो विश्वासातील व्यापाऱ्यांनाच आपला माल विकावा तसेच कापूस मोजताना ताणकाटा ऐवजी इलेक्ट्रॉनिक काटा वापरण्याचा आग्रह धरावा. चाळीसगाव तालुक्यातील इतर अनेक शेतकऱ्यांची देखील फसवणूक झाली असून ते पिडीत शेतकरी देखील तक्रारी घेऊन पुढे येतील. त्यांच्या फिर्यादी स्वतंत्रपणे दाखल करून घेत त्यांना न्याय मिळवून द्यावा व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना पोलीस निरीक्षक यांना केली. यात कितीही मोठा व्यापारी अथवा व्यक्ती असला तरी शेतकऱ्यांना लुटणाऱ्याची गय केली जाणार नाही, असा इशारा चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.