Jalgaon Crime : यूट्यूबवरची बातमी, आमदारांचा संताप, पत्रकाराला मारहाण, जळगाव प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?
Jalgaon Crime : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवाराला ठोस आश्वासन न देता केवळ जनतेसमोर चमकोगिरी केल्याची बातमी युट्युब पोर्टलवर लावली होती.
जळगाव : जळगाव (Jalgaon) येथील पत्रकाराला मारहाण (Journalist Beaten) प्रकरणाने वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणावर आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पत्रकार संदीप महाजन (Sandeep Mahajan) यांना आमदार किशोर पाटील यांच्याकडून झालेली शिवीगाळ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीनंतर या घटनेशी आपला संबंध नाही, आपण त्याचा निषेध करतो, आ किशोर पाटील यांची भूमिका नौटंकी असल्याचं पत्रकार संदीप महाजन यांनी म्हटलं आहे.
नुकतीच जळगाव जिल्ह्यात भडगाव (Bhadgaon) तालुक्यात गोंडगाव येथे आठ वर्षीय मुलीवर अत्याचार (Girl Molestation) करुन तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी पाचोरा शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये पीडित मुलीचे कुटुंब देखील सहभागी झाले होते. यावेळी किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पीडित परिवाराशी शिंदे यांचे बोलणे करुन दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित परिवाराला आरोपीस कठोर शिक्षा होण्यासाठी उज्ज्वल निकम यांच्यासारखे वकील लावण्याबाबत चर्चा केली. जलद गती न्यायलयात हा खटला चालवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं आश्वासन दिले होते.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिवाराला कोणतेही ठोस आश्वासन न देता केवळ जनतेच्या समोर चमकोगिरी केल्याची बातमी पत्रकार संदीप महाजन यांनी आपल्या यूट्यूब पोर्टलवर (YouTube Portal) लावली होती. अधिवेशन काळात अतिशय व्यस्त काळात देखील मुख्यमंत्री वेळात वेळ काढून परिवाराचं सांत्वन केले. आरोपीला शिक्षा करण्याविषयी सरकार गंभीर असल्याचं सांगितलं, असं असताना पत्रकार संदीप महाजन हे त्याला चमकोगिरी म्हणत असल्याचा राग आमदार किशोर पाटील यांच्या मनात असल्याचे सांगितले जात आहे. याच रागातून त्यांनी पत्रकार संदीप महाजन यांना फोन करुन शिवीगाळ केल्याचे समोर आले. या प्रकाराची ऑडिओ क्लिप वायरल होताच आमदार किशोर पाटील यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात होता.
या घटनेत आ किशोर पाटील यांनी आपली भूमिका मांडताना महाजन या पत्रकाराला आपणच शिवीगाळ केली, असल्याचं मान्य करुन आपण बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत, जे केले ते मान्य करतो, आपण जे केले ते बरोबर केले आहे. ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेत आपण उत्तर दिले आहे आणि देणार आहे. ज्या पद्धतीने लोक प्रतिनिधीला आचारसंहिता आहे, तशी ती पत्रकारांनीही जपली पाहिजे, अस सांगत महाजन हे बदनाम असलेले पत्रकार असल्याचं आ किशोर पाटील यांनी म्हटल होते. या घटनेत आपण शिवीगाळ केल्याचं मान्य केले होते, मात्र पत्रकाराला मारहाण झाल्याचं मला आज सकाळी कळलं, या घटनेशी आपला किंवा आपल्या कार्यकर्त्यांचा संबंध नाही, या घटनेचा मी निषेध करतो, असे आमदार किशोर पाटील यांनी म्हटल आहे.
माझ्या जीवाला धोका, पोलीस संरक्षण हवं
या घटनेनंतर काल पुन्हा पत्रकार संदीप महाजन याना पाचोरा शहरात काही तरुणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. ही मारहाण किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं आणि आपल्या जिवाला धोका असल्याचं संदीप महाजन यांनी म्हटलं. आपल्याला मारहाण करणारे तरुण हे आमदार किशोर पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. मारहाण घटनेशी आपला संबंध नाही, या घटनेचा निषेध करतो, ही आमदार किशोर पाटील यांची भूमिका म्हणजे नौटंकी असल्याचं संदीप महाजन यांनी म्हटलं आहे. या घटनेत पोलिसांनी संदीप मारहाण करणाऱ्या तरुणाच्या विरोधात दखल पात्र गुन्ह्याची नोंद केली होती. प्रतिबंधात्मक कारवाई करुन पोलिसांनी सोडून दिल्याने संदीप महाजन यांनी नाराजी व्यक्त केली असून पोलीस आपल्याला सहकार्य करत नसल्याने आपल्या जीवाला धोका निर्माण झाला असून आपल्याला संरक्षण मिळण्याची मागणी महाजन यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधींनी सुसंस्कृतपणा जपला पाहिजे...
आ किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना केलेली शिवीगाळ आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर आ किशोर पाटील यांच्या चुलत भगिनी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत निशाणा साधला आहे. किशोर पाटील यांच्या नावाचा उल्लेख टाळत पत्रकाराला मारहाण करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध केला पाहिजे आणि अशा लोकप्रतिनिधींनी राजकारण करताना सुसंस्कृतपणा जपला पाहिजे, असे सांगत आपल्याला भावाला चांगल वागण्याचा सल्ला दिला आहे.
आपल्याजवळ कार्यकर्त्यांचे फोटो
पाचोरा येथील आ किशोर पाटील यांचे प्रतिस्पर्धी आणि विरोधक राहिलेल्या भाजप तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनीही आ किशोर पाटील यांनी पत्रकारास केलेली शिवीगाळ आणि कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण याचा निषेध केला आहे. तर आपला या घटनेशी कोणताही संबंध नाही हे आ किशोर पाटील कसे म्हणू शकतात, कारण मारहाण करणारे जवळचे कार्यकर्ते आहेत, हे संपूर्ण पाचोरा शहराला माहित आहे. किशोर पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचे आपल्याजवळ फोटो असल्याचं सांगत त्यांनी किशोर पाटील आणि मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांचे फोटो ही माध्यमांच्या पुढे सादर करुन किशोर पाटील यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
इतर महत्वाची बातमी :