Jalgaon School Bus Accident : स्कूल बसचे स्टेअरिंग रॉड तुटून चालकाचे नियंत्रण सुटलं, बस झाडाला आदळली, 25 ते 30 विद्यार्थी जखमी
Jalgaon School Bus Accident : मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसचे स्टेअरिंग रॉड तुटून नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली.
Jalgaon School Bus Accident : मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसचे स्टेअरिंग रॉड (Steering Rod) तुटून नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात घडली. पहूर-शेंदुर्णी रस्त्यावर आज सकाळी हा अपघात (Accident) झाला. या घटनेत बस पलटी होऊन विद्यार्थी (Students) जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी सुमारे सातच्या सुमारास शेंदुर्णी इथल्या सरस्वती विद्या मंदिर या शाळेची बस (School Bus) पहूरहून विद्यार्थ्यांना घेऊन येत होती. परंतु बस पाचोरा-शेंदुर्णी रस्त्यावर आल्यावर स्टेअरिंग रॉड तुटला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल भागात पडली. तिथे असलेल्या झाडाला बसची जोरदार धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की झाडाचे अक्षरश: मोडून दोन तुकडे झाले आणि धडक दिल्यानंतर बस उलटली. पहूर ते शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबाजवळ हा अपघात झाला. या बसमध्ये सुमारे 40 विद्यार्थी आणि काही शिक्षक होते. यातील अंदाजे 30 विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले आहेत.
सुदैवाने जखमींपैकी कोणालाही गंभीर इजा नाही
अपघाताची माहिती मिळताच परिसरातून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खासगी वाहनांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. या अपघातातील जखमींपैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे.
चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस झाडावर आदळली
दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला? स्कूल बस नेमकी कशी उलटली असे प्रश्न उपस्थित झाले होते. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं. यामुळे बस झाडावर आदळून हा अपघात झाला.
...आणि पालक, शिक्षकांचा जीव भांड्यात पडला!
तथापि, अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र विद्यार्थी सुखरुप असल्याने पालक आणि शिक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे. अपघातामध्ये जखमी झालेले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर पहूर, शेंदुर्णी आणि जळगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बसचा स्टेअरिंग रॉड तुटेपर्यंत या वाहनाची तपासणी झाली नव्हती का? तपासणी केली असेल तर बस रस्त्यावर चालवण्यास परवानगी कशी देण्यात आली. तसंच बसचा स्टेअरिंग रॉड अचानक कसा तुटला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
VIDEO : Jalgaon Bus Accident : जळगावात स्टीरिंग रॉड तुटल्याने बसचा भीषण अपघात, विद्यार्थी जखमी