Nobel Prize : डायनामाइटचा विध्वंसक शोध, नंतर 'मृत्यूचा व्यापारी'च बनला मानवतेचा तारणहार; नोबेल पुरस्काराचा इतिहास काय?
History Of Nobel Prize : एकूण सहा क्षेत्रात देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्काराची पार्श्वभूमीही तितकीच रोमांचकारी आहे. महात्मा गांधींनाही तब्बल पाच वेळा नोबेल पुरस्काराचे नामांकन मिळाले होते.

Nobel Prize Story : यंदाच्या सर्व नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली, पण चर्चेत राहिला तो शांततेचा नोबेल पुरस्कार. त्याला कारणही तसंच होतं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) यांनी त्यावर दावा केला आणि तो आपल्यालाच मिळावा असा धमकीवजा इशाराही दिला होता. पण नोबेल समिती (Nobel Foundation Committee) त्या दबावापुढे झुकली नाही. व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो (Maria Corina Machado) यांना यंदाचा शांततेचा नोबेल (Nobel Peace Prize) पुरस्कार जाहीर करण्यात आला. मारिया मचाडो यांनी लोकशाहीला वाचवण्यासाठी हुकूमशाहीविरोधात 20 वर्षे संघर्ष केला आहे. त्यांच्या साहसाचा सन्मान करत त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा, या पुरस्कारासाठी केलेली आदळाआपट आणि पुरस्कार नाकारल्यानंतर व्यक्त केलेली खंत, या सगळ्या नाट्यमय घडामोडी यंदा पाहायला मिळाल्या. पण या नोबेल पुरस्काराचा इतिहासही तसाच नाट्यमय, रोमांचक आहे.
जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जाणारा नोबेल पुरस्कार हा एका अशा व्यक्तीच्या नावाने दिला जातो, ज्याने विध्वंसाचे साधन असलेल्या डायनामाइटचा शोध लावला. आल्फ्रेड नोबेल असं त्या व्यक्तीचे नाव. डायनामाइटच्या शोधानंतर जगभरातील युद्धामध्ये त्याचा वापर होऊ लागला. त्यानंतर आल्फ्रेड नोबेलला त्यांची चूक उमजली आणि त्याने त्यातून मिळवलेली संपत्ती मानवतेच्या कल्याणासाठी लावली. त्यातून सुरू झालेला पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार.
Who Was Alfred Nobel : कोण होता आल्फ्रेड नोबेल?
21 ऑक्टोबर 1833 रोजी स्वीडनमध्ये जन्मलेला आल्फ्रेड नोबेल हा रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि संशोधक होता. त्याने आयुष्यात तब्बल 355 शोधांचे पेटंट घेतले. त्यातील सर्वात प्रसिद्ध शोध होता तो म्हणजे डायनामाइट, एक शक्तिशाली आणि तुलनेने सुरक्षित स्फोटक.
Discovery of Dynamite : डायनामाइटचा शोध आणि त्याचे परिणाम
नोबेलने 1867 मध्ये नायट्रोग्लिसरीनला विशेष मातीमध्ये मिसळून डायनामाइट तयार केले. या शोधामुळे बांधकाम आणि खाणकाम क्षेत्रात मोठी क्रांती झाली. मात्र, नंतर या स्फोटकाचा वापर युद्धात आणि विध्वंसासाठीही होऊ लागला.
एकदा आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूची अफवा पसरली आणि त्याची बातमीही वृत्तपत्रात छापून आली. वृत्तपत्रामध्ये आल्फ्रेड नोबेलचा उल्लेख 'मृत्यूचा व्यापारी' (Merchant of Death) असा करण्यात आला होता.
History Of Nobel Prize : नोबेल पुरस्काराची सुरुवात
आपल्या नावाशी ‘मृत्यूचा व्यापारी’ हा शब्द जोडला गेल्याने नोबेल हादरला. लोकांच्या नजरेत आपला शोध चुकीच्या अर्थाने घेतला गेला, ही गोष्ट त्याला अस्वस्थ करत होती. त्याचमुळे त्याने मृत्यूपत्र लिहून ठेवले आणि आपली सर्व संपत्ती मानवजातीच्या कल्याणासाठी पुरस्कारांच्या रूपात वापरली जावी अशी इच्छा व्यक्त केली. अशा प्रकारे 1901 सालापासून नोबेल पुरस्कारांची सुरुवात झाली. डायनामाइटमुळे मिळालेल्या संपत्तीतूनच आज जगभरातील शास्त्रज्ञ, साहित्यिक आणि शांततेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित केले जाते.
नोबेल पुरस्कार कोणाला दिले जावेत यासाठी एक समिती अभ्यास करते. त्यानंतर त्या-त्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिले जातात. शांततेचा नोबेल पुरस्कार नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे दिला जातो, तर उर्वरित सर्व स्वीडनमधील स्टॉकहोम येथे दिले जातात.
Nobel Prize Sectors : नोबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रांत दिले जातात?
भौतिकशास्त्र
2. रसायनशास्त्र
3. वैद्यकशास्त्र (शारीरशास्त्र)
4. साहित्य
5. शांतता
6. अर्थशास्त्र
सुरुवातील अर्थशास्त्रासाठी नोबेल देण्यात येत नव्हता. पण 1968 पासून या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येऊ लागला.
History Of Nobel Proze For Peace : शांततेचा नोबेलचा इतिहास
1901 मध्ये शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार रेड क्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनाँ यांना मिळाला.
- मदर तेरेसा (1979)
- मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर (1964)
- नेल्सन मंडेला आणि एफ.डब्ल्यू. डी क्लार्क (1993)
- मलाला युसुफझाई आणि कैलाश सत्यार्थी (2014)
- नर्गेस मोहम्मदी (2023) यांनी महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष करताना हा सन्मान मिळवला.
- 2025 सालचा पुरस्कार मारिया मचाडो यांना मिळाला.
Mahatma Gandhi Nobel Prize : महात्मा गांधींना पाच वेळा नामांकन
महात्मा गांधींना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 1937, 1938, 1939, 1947 आणि 1948 या सालासाठी पाच वेळा नामांकन करण्यात आलं होतं. पण त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही. त्यांच्या मृत्यूपश्चात नोबेल समितीने त्यावर खंतही व्यक्त केली होती.
Nobel Prize Winners In India : भारतातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी
रवींद्रनाथ टागोर (1913)
क्षेत्र: साहित्य
गीतांजली या काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्कार. भारतीय आणि आशियाई म्हणून पहिले नोबेल विजेते.
सर सी. व्ही. रमन (1930)
क्षेत्र: भौतिकशास्त्र
रमन इफेक्ट या प्रकाशाच्या विखुरण्याच्या शोधासाठी नोबेल.
मदर तेरेसा (1979)
क्षेत्र: शांतता
गरीब, रुग्ण आणि निराधार लोकांसाठी मानवतावादी कार्य.
अमर्त्य सेन (1998)
क्षेत्र: अर्थशास्त्र
कल्याणकारी अर्थशास्त्र आणि गरिबी मापन क्षेत्रातील योगदान.
व्ही. एस. नायपॉल (V. S. Naipaul) (2001)
क्षेत्र: साहित्य
भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक, साहित्यिक लिखाणासाठी.
व्हेन्कटरमण रामकृष्णन (2009)
क्षेत्र: रसायनशास्त्र
रिबोसोमची रचना आणि कार्य यावर संशोधन. (भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन वैज्ञानिक)
कैलाश सत्यार्थी (2014)
क्षेत्र: शांतता
बालकांच्या शिक्षण, हक्क आणि बालमजुरीविरोधातील लढ्यासाठी.
अभिजित बॅनर्जी (2019)
क्षेत्र: अर्थशास्त्र
गरिबीविरोधी धोरणांवरील प्रयोगात्मक संशोधन (एस्थर डुफ्लो आणि मायकेल क्रेमर यांच्यासह).
Nobel Prize Winners List : शांततेचा नोबेल मिळालेले जगभरातील प्रमुख व्यक्ती
मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर (Martin Luther King Jr.) – 1964
वर्णभेदाविरुद्ध आणि मानवी हक्कांसाठी शांततामय आंदोलनाचे नेतृत्व.
ले डख थो (Le Duc Tho) आणि हेन्री किसिंजर (Henry Kissinger) – 1973
व्हिएतनाम युद्धातील युद्धविरामासाठी प्रयत्न.
मदर तेरेसा (Mother Teresa) – 1979
गरीब, रुग्ण आणि निराधार लोकांसाठी मानवतावादी कार्य.
दलाई लामा (Dalai Lama – Tenzin Gyatso) – 1989
तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक संघर्ष आणि जागतिक शांततेचा प्रसार.
आंग सान सू ची (Aung San Suu Kyi) – 1991
म्यानमारमध्ये लोकशाही आणि मानवाधिकारांसाठी अहिंसक संघर्ष.
नेल्सन मंडेला (Nelson Mandela) – 1993
दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी लढ्यात नेतृत्व.
एफ. डब्ल्यू. डी क्लार्क (F. W. de Klerk) – 1993
नेल्सन मंडेला यांच्यासह वर्णभेद समाप्तीसाठी प्रयत्न.
कोफी अन्नान (Kofi Annan) – 2001
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव म्हणून जागतिक शांतता आणि मानवाधिकारांच्या प्रोत्साहनासाठी कार्य.
जिमी कार्टर (Jimmy Carter) – 2002
संघर्ष निराकरण आणि लोकशाही, मानवी हक्कांच्या प्रसारासाठी कार्य.
अल गोर (Al Gore) आणि IPCC संस्था – 2007
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांविषयी जनजागृती.
बराक ओबामा (Barack Obama) – 2009
आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, लोकशाही आणि आण्विक निशस्त्रीकरणासाठी योगदान.
लिउ झियाओबो (Liu Xiaobo) – 2010
चीनमध्ये लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी संघर्ष.
मलाला युसुफझाई (Malala Yousafzai) – 2014
मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी लढा.
कैलाश सत्यार्थी (Kailash Satyarthi) – 2014
योगदान: बालमजुरीविरोधी चळवळ आणि बालकांच्या शिक्षणासाठी कार्य.
नर्गेस मोहम्मदी (Narges Mohammadi) – 2023
योगदान: इराणमधील महिलांच्या हक्कांसाठी आणि मानवाधिकारांसाठी संघर्ष.
दरवर्षी 10 डिसेंबरला, नोबेलच्या मृत्यूदिनानिमित्त हे पुरस्कार दिले जातात. चुकीची जाणीव हीच परिवर्तनाची पहिली पायरी आहे हे नोबेलच्या विचारसरणीतून दिसून येते. त्याच्या डायनामाइटच्या शोधाने जग हादरले, पण त्याच्या विचारांनी जगाला शांततेचा मार्ग दाखवला हेदेखील खरे आहे.
ही बातमी वाचा:



















