(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon Politics : आताच 44 प्लस आहे, आगे आगे देखो होता है क्या.. काही दिवसांनंतर पूर्णच राष्ट्रवादीच आमच्याकडे येईल; अनिल भाईदास पाटील
Jalgaon Politics : "आताच 44 प्लस आहे, आगे आगे देखो होता है क्या. काही दिवसांनंतर पूर्णच राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याकडे येईल," असा दावा मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे.
Jalgaon Politics : "आताच 44 प्लस आहे, आगे आगे देखो होता है क्या. काही दिवसांनंतर पूर्णच राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याकडे येईल," असा दावा मंत्री अनिल भाईदास पाटील (Anil Bhaidas Patil) यांनी केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचं पहिल्यांदाच जळगावात (Jalgoan) आगमन झालं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनिल भाईदास पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अमळनेरला कॅबिनेट मंत्रिपद
अनिल भाईदास पाटील म्हणाले की, "स्वप्नातही विचार केला नव्हता की मंत्रिपद मिळेल. ज्या दिवशी शपथविधी झाला, त्या दिवशी माझी आई शेतात गेली होती, छोटा कार्यकर्ता हा मंत्रिपदापर्यंत पोहोचला आहे. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. अमळनेर तालुक्याच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद मिळाला आहे आणि ते मला मिळालं त्याचा मोठा आनंद आहे. अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे , प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून ही संधी प्राप्त झाली.
जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी काय काय करता येईल त्यामुळे अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी माझ्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. येणाऱ्या काळामध्ये सकारात्मक चित्र दिसेल. एक नंबरचा पक्ष राष्ट्रवादी कसा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे, असंही अनिल पाटील यांनी म्हटलं.
'काही दिवसांनंतर पूर्णच राष्ट्रवादीच आमच्याकडे'
अजित पवार यांच्या बाजूने आमदारांची संख्या किती यावर बोलताना मंत्री अनिल भाईदास पाटील म्हणाले की, "आगे आगे देखो होता है क्या. आताच 44 प्लस आहे, यापुढे तो 46, 47,48 होईस. पुढे मला असं वाटतं की पूर्ण राष्ट्रवादीच आमच्याकडे येईल. पण आज 44 प्लस हा आमचा आकडा आहे"
जळगावातील समस्या प्राधान्याने मार्गी लावणार
देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले तेव्हा विरोधात होतो. पण ज्या मागण्यांसाठी दाखवले, त्याच सोडवण्याचं आव्हान आमच्यासमोर आहे. त्यावेळी विरोधात होतो म्हणून विरोधाचं काम केलं मात्र आता सत्तेचा वापर जळगाव जिल्ह्यात दोन्ही मंत्रांच्या सोबतीने विकासासाठी कसा केला जाईल याचा प्रयत्न आहे, असं पाटील यांनी म्हटलं
विद्यार्थ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या आणि तरुणांच्या रोजगाराच्या अशा सर्व छोट्या छोट्या समस्यांची मला जाणीव आहे. येणाऱ्या आठवड्यात या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. प्रॅक्टिकल दृष्टीकोनातून जे अडचणीचे विषय आहेत ते मार्गी लावले जातील. जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या मागण्यांसाठी आम्ही आतापर्यंत आवाज उठवले आहेत त्या समस्या प्राधान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न राहिल, अनिल भाईदास पाटील यांनी म्हटलं.