(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जळगावात ठाकरे गटाने खेळी खेळताच भाजपकडूनही हालचाली सुरु, करण पवारांविरोधात 'या' नेत्याची चाचपणी, स्मिता वाघ यांचा पत्ता कट होणार?
Jalgaon Lok Sabha : करण पवार यांनी भाजपच्या स्मिता वाघ यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. यामुळे भाजपकडून त्यांच्या विरोधात पर्यायी उमेदवाराला संधी देण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.
Jalgaon Lok Sabha : जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करत भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. तर शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघात मोठी खेळी करत उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश करण्यात आला.
तसेच पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांना सोबत नेत त्यांना उमेदवार म्हणून भाजपच्या स्मिता वाघ यांच्यासमोर आव्हान उभे केले. या अनेपक्षित धक्क्यामुळे भाजपने पुन्हा स्मिता वाघ यांना पर्याय म्हणून माजी खासदार ए. टी. पाटील यांची उमेदवारीसाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे. ए. टी. पाटील यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींची भेट घेतल्याचीही माहिती मिळत आहे.
भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली?
जळगाव लोकसभा मतदारसंघात उन्मेष पाटील यांनी करण पवार यांच्यासह ठाकरे गटाची मशाल हातात घेतली. त्यामुळे स्मिता वाघ यांच्यासमोर भाजपमधील बंडखोरीतून तगडे आव्हान उभे राहिले आहे. परिणामी, वाघ यांच्या विजयाबाबत सांशकता निर्माण झाल्याने उमेदवार बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
ए. टी. पाटील यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींची भेट
यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी उमेदवार बदलणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र मागील काही दिवसांत ए. टी. पाटील यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. पाटील यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अॅड. रोहित पाटील यांच्या नावाचीदेखील चर्चा सुरु आहे.
कोण आहेत ए टी पाटील?
ए. टी. नाना पाटील हे जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपकडून दोन वेळा निवडून आले आहेत. 1990-95 आणि 1995-97 याकाळात ते नगरसेवक झाले. 1998-2000 दरम्यान ते पारोळा नगरपालिकेचे अध्यक्ष होते. त्यानंतर पुन्हा 2001 ते 2006 सालादरम्यान ते पारोळा नगरपालिकेचे अध्यक्ष बनले. 2002 ते 2005 साली ते पारोळा एपीएमसी अध्यक्ष होते. 31 ऑगस्ट 2009 साली संरक्षण समिती, सल्लागार समिती, गृहनिर्माण मंत्रालय, सल्लागार समिती, शहरी गरीबी निर्मूलन मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाचे ते सदस्य बनले. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांनाच जळगाव लोकसभा मतदार संघाची भाजपची उमेदवारी मिळणार, हे निश्चित मानले जात होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि खळबळ उडाली होती. त्यामुळे पक्षाने त्यांची उमेदवारी कापली होती. आता पुन्हा एकदा ए टी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे.
आणखी वाचा
'मोदींचे नेतृत्व मान्य, पण रक्षा खडसेंना माझी आवश्यकता नसेल तर...', चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा