Eknath Khadse : 'क्या हालत बना ली दादा तुमने, यहा तो शेर थे, आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला?' एकनाथ खडसे यांचा सवाल
Eknath Khadse : आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावातील सभेत आपल्या शैलीत सरकारवर निशाणा साधत अजित पवारांना चिमटा काढला.
जळगाव : अजितदादा (Ajit Pawar) काम करणारा स्वाभिमानी माणूस, पण पक्ष बदलावा लागला. आज अजितदादा निर्णय घेत आहेत, पण फडणवीस आणि मुख्यमंत्री यांची सही झाल्यानंतर. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचारांना डावलून सत्तेत सहभागी झाल्यांनतर 'क्या हालत बना ली दादा तुमने, यहा तो शेर थे, तुमच्या आवाजाला वजन होत, पक्षांमध्ये किंमत होती, पण आज प्रत्येक फाईल त्यांच्या नजरेखालून घालावी लागत आहे. आता तुमचा स्वाभिमान गेला कुठे? असा खणखणीत सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी अनेक दिवसांनंतर आपल्या शैलीत सरकारवर निशाणा साधत अजितदादा यांना चिमटा काढला. एकनाथ खडसे म्हणाले की, आज राज्यात तिघांचं सरकार असून आज 'दोन बायका फजिती ऐका' अशी स्थिती झाली आहे. त्यात अजित पवार यांची घुसमट होताना दिसून येत आहे. एकीकडे राष्ट्रवादी पक्षात असताना अजित पवारांच्या आवाजाला वजन होत, पक्षात किंमत होती, मात्र आज काही निर्णय घ्यायचे असल्यास गृहमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीशिवाय फाईल पुढं सरकत नाही, आता अजित पवार यांचा स्वाभिमान कुठे गेला, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.
एकनाथ खडसे यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधताना म्हणाले की, 'मी रक्ताचं पाणी करून भाजपला वाढवलं, आज काय परिस्थिती झाली, हे तुम्ही बघताय. मी गेल्या अनेक वर्ष भाजपच काम केलं, जळगाव जिल्ह्यात भाजपाला स्थान मिळवून दिल. मात्र आज काय अवस्था झालीय, हे सांगणं कठीण आहे. भाजप पक्षात जुन्या लोकांना स्थान नाही, सगळे बाहेरचे आणलेले आहेत. वापरा आणि फेकून द्या ही भावना भाजप पक्षाची आहे. याच भाजप पक्षाने 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर केला. मग अजित पवार (Ajit Pawar) यांना मंत्रिमंडळात स्थान का दिले, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. सारेच मंत्री झाले मग यांना कसं तुमच्यात घेतलं, आता तुमच्या तोंडाला कुलूप लागले काय? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा
तसेच जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी (Jalgaon Crime) वाढली असून जळगाव जिल्ह्यातील 2 नंबरवाल्यांची यादी फडणवीस यांच्याकडे देतो. कोण पोलीस अधिकारी किती पैसे कमावतो, त्यांची नावे देतो. कायदा व्यवस्था शिल्लक राहिलेली नाही, महिलांवर अत्याचार होत आहेत, अशांना माज आणि मस्ती आली आहे, ही मस्ती उतरवली पाहिजे. आज एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी जमली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून काय मिळालं? काहीच नाही. सर्वाना उचलून आणलेले, भत्ते देऊन आणलेलं. मात्र आता उद्याचे पंतप्रधान शरद पवार तुमच्यासोबत आहेत, त्यामुळे घाबरण्यासारखे कारण नाही, तुमची सोबत राष्ट्रवादीला ऊर्जा देणारी आहे. त्यामुळे आता जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे. छोटी मोठी निवडणूक जिंकायची आहे, हळूहळू पुन्हा पक्षाची बांधणी करायची आहे. तुमच्या सगळ्यांच्या आधारावर राष्ट्रवादी पक्ष वाढवायचा आहे, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले.
इतर महत्वाची बातमी :