Eknath Khadse: जळगाव जिल्हा दूध संघावर सात वर्षानंतर सत्तांतर, खडसेंच्या गडाला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाची एकहाती सत्त्ता
Jalgaon Dudh Sangh Elections: जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाने 20 पैकी 16 जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे.
जळगाव : जिल्हा दूध संघावर तब्बल सात वर्षानंतर सत्तांतर झाले असून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सहकार पॅनलचा दणदणीत पराभव झाला. जळगाव दूध संघावर आज गिरीश महाजन यांच्या भाजप-शिंदे गटाची एकहाती सता मिळवली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने मुसंडी मारली आहे. 20 जागांपैकी 16 जागांवर भाजप शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमदेवार विजयी झाले आहेत.
यंदा जिल्हा दूध संघाचे निवडणुकीत एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. 20 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. पाचोरा मतदार संघाची जागा बिनविरोध झाली होती. उर्वरित 19 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने विजय मिळवला आहे. 19 जागांपैकी 16 जागांवर भाजप शिंदे गटाच्या शेतकरी पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीच्याच म्हणजे एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलला पराभवाची धूळ चारली आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत काही लढती या चुरशीच्या झाल्या. यात मुक्ताईनगर येथील मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या विरोधातील शेतकरी पॅनलचे उमेदवार भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर दुसरीकडे धरणगाव मतदार संघातून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विजय मिळवत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार मालतीबाई महाजन यांचा पराभव केला आहे. जामनेर मतदार संघातून गिरीश महाजन, तर पारोळा मतदार संघातून आमदार चिमणराव पाटील हे सुध्दा विजयी झाले आहेत.
निकालानंतर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, "जळगाव दूध संघ हा आम्हाला राज्यात सर्वात पुढे आणायचा आहे, हा संघ वाचवण्याचा शेतकऱ्याच्या भावना होत्या. त्यांसाठी आम्ही या निवडणुकीत उतरलो होतो. शेतकऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने आमच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत खोक्यांचा आरोप केला गेला असला तरी त्यांचे चार उमेदवार निवडून आले. तर त्यांनी खोके वाटले असे आम्ही म्हणायचे का? खडसे यांनी पराभव स्वीकारला पाहिजे."
जळगाव दूध संघात पराभव झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, विरोधी पक्षाकडून खोक्यासह साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर हा केला गेल्याने आम्हाला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. मात्र पराभव शेवटी पराभव असतो तो आम्हाला मान्य असल्याचं सांगत खडसे यांनी विजयी उमेदवारांचा अभिनंदन केलं.
एकनाथ खडसे म्हणाले की, "मात्र नव्याने निवडून आलेल्या संचालकांनी चांगल काम करून दाखवावे ही अपेक्षा आहे. ही निवडणूक लागली असताना तिला ब्रेक दिला गेला, नंतर पुन्हा निवडणूक जाहीर केली. अस राज्यात पहिल्यांदाच घडल आहे. या निमित्ताने आम्हाला गाफील ठेवण्यात आले. या निवडणुकीत आम्ही निवडून येईल अशी परिस्थिती होती. आम्ही सतेवर असताना चांगल्या प्रकारे आणि पारदर्शीपणाने दूधसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असला तरी कमी मताच्या फरकाने अनेक जागा गेल्या आहेत. आमच्या विरोधात दोन सत्ताधारी मंत्री, दोन खासदार, आमदार एवढे होते. त्याचाही विचार केला गेला पाहिजे."