(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चक्रीवादळ, पावसामुळे केळी बाग उद्ध्वस्त; चिंतातूर शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
आपलीही तीन एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त झाली, हे कळल्यानंतर जळगावातील लोटन पाटील यांना मानसिक धक्का बसला आणि या धक्क्यातून हृदयविकाराचा झटका येऊन जागीच मृत्यू झाला.
जळगाव : जळगाव जिल्ह्यात काल (10 जून) झालेल्या चक्रीवादळ (Hurricane) आणि पावसामुळे (Jalgaon Rain) केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. याचा मानसिक धक्का बसून शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चोपडा तालुक्यातील गोरगावले इथे ही घटना घडली. लोटन फकिरा पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांच्या मृत्युमुळे संपूर्ण गाव सुन्न झालं आहे. शोकाकुल वातावरणात आज (11 जून) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोटन फकीरा पाटील यांचा शेतीवर उदरनिर्वाह होता. तीन बिघे शेतामध्ये त्यांनी टिशू कल्चर केळीची लागवड केली होती. काल मान्सूनपूर्व पाऊस आणि चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने गोरगावले गावातील इतर शेतकऱ्यांना बरोबरच लोटन फकिरा पाटील यांची केळीची बागही जमीनदोस्त होऊन लाखोंचं नुकसान झालं. लोटन पाटील काल सायंकाळी शेतातून घरी आले. यांनतर चक्रीवादळ आणि पाऊस आला. यावेळी गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेताकडे धाव घेतली. आपलीही संपूर्ण तीन एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त झाली आणि मोठं नुकसान झालं, हे शेजारच्याकडून लोटन पाटील यांना कळलं. काही वेळातच त्यांना मानसिक धक्का बसला आणि या धक्क्यातून हृदयविकाराचा झटका येऊन जागेवरच मृत्यू झाला.
लोटन पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांचा मुलगा दिव्यांग आहे. तर पत्नीही सतत आजारी असते. गेल्या वर्षीही नुकसान झाल्यामुळे हाती दमडीही आली नाही. यंदाही कर्ज काढून केळी लागवड केली. काही दिवसांनी केळी हातात येईल अशी आशा असतानाच पावसाने या त्यावर पाणी फिरवलं. पाच लाखांचं कर्ज आणि त्यातच झालेलं नुकसान त्यामुळे आता उदरनिर्वाह करायचा तरी कसा या चिंतेने लोटन पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. तसंच मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सततचं अस्मानी आणि सुलतानी संकट तर दुसरीकडे योग्य भाव मिळत नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कर्ज काढून शेतकरी केळी पिकाची लागवड करतो मात्र हातात काही येत नाही. त्यातच विमा कंपनीची नुकसान भरपाई मिळण्यासाठीची किचकट प्रक्रिया आणि हातात येणारी मदत तोकडी त्यामुळे जगावं कसं हाच प्रश्न आता केळी उत्पादक शेतकर्यांसमोर उभा टाकला आहे.